कर्जत/संतोष पेरणे : कर्जत येथील पत्रकार प्रथमेश कुडेकर हल्ला प्रकरणी कर्जत पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे.या हल्ल्याप्रकरणी 14 दिवसांनी पोलीस हल्लेखोर यांच्यापर्यंत पोहचले असून आणखी तीन आरोपींचा शोध कर्जत पोलिस घेत आहेत. दरम्यान या घटनेप्रकरणी कर्जत तालुक्यातील पत्रकारांनी पोलीस उप अधिक्षक यांची भेट घेऊन पत्रकार हल्ला विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करून कारवाई करावी अशी मागणी केली आहे.
पत्रकार प्रथमेश कुडेकर हल्ला प्रकरणी कर्जत येथे पोलिस उप अधिक्षक राहुल गायकवाड यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी कर्जत पोलिस ठाण्याचे निरीक्षक संदीप भोसले यांच्या सह घटनेची माहिती दिली एक ऑगस्ट २०२५ रोजी पत्रकार प्रथमेश कुडेकर आणि त्यांचे सहकारी मयूर रणदिवे ह्यांच्यावर चार फाटा परिसरात काही अज्ञात इसमांनी प्राणघातक हल्ला केला होता.
लोखंडी रॉड , फायटर आणि सापळा पद्धतीने केलेल्या ह्या हल्ल्यात पत्रकार प्रथमेश कुडेकर यांना गंभीर दुखापत झाली होती. राहुल गायकवाड यांनी माहिती देताना कर्जत पोलीस ठाणे येथील पोलिसांनी अधिक तपास करून काही तांत्रिक मुद्द्यांद्वारे घटनास्थळ परिसर , खोपोली , खालापूर , चौक , नेरळ आणि द्रुतगती मार्गासह , शेडुंग टोलनाका परिसरातील असंख्य सीसीटीव्ही तपासून या गुन्ह्यातील आरोपींना निष्पन्न करण्यात पोलिसांना यश आले.
या गुन्ह्यात आत्तापर्यंत कर्जत आणि महाड ह्या परिसरातून एकूण तीन आरोपींना अटक करण्यात आली असून उर्वरित चार आरोपींचा शोध पोलीस घेत आहे. अटक केलेल्या तीन आरोपीना न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती आणि १५ ऑगस्ट रोजी आरोपींना जामीन मिळालेला आहे.आरोपींनी गुन्ह्याकरिता वापरलेली एक मोटारसायकल आणि एक मारुती वॅगन आर कार जप्त करण्यात आलेली आहे.
या गुन्ह्याच्या तपासात कर्जत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप भोसले ह्यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वरोटे , पोलिस उप निरीक्षक सुशांत वरक,पोलिस उप निरीक्षक किरण नवले , पोलीस हवालदार स्वप्नील येरुणकर , पोलीस हवालदार समीर भोईर,पोलिस नाईक प्रवीण भालेराव,विठ्ठल घावस,पोलीस हवालदार सागर शेवते हे करीत आहेत.
कर्जत तालुक्यातील या प्रकरणामुळे पत्रकार सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून पत्रकार प्रथमेश कुडेकर हल्ला हा एका पत्रकारावर झालेला हल्ला असून त्या बाबतचा गुन्हा पत्रकार हल्ला विरोधी कायद्या अंतर्गत दाखल व्हावा अशी मागणी केली.त्या मागणीचे निवेदन कर्जत तालुक्यातील पत्रकारांनी पोलीस उप अधिक्षक राहुल गायकवाड यांना सादर केले.