अक्कलकोट येथील 28 वर्षीय तरुण शेतकऱ्याची आत्महत्या (File Photo : Farmer Suicide)
गोंदिया : अवकाळी पाऊस, पिकाला न मिळणारा हमीभाव तर कधी बँक व सावकारांच्या कर्जामुळे शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. गोंदिया जिल्ह्यात गत 24 वर्षांत 301 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. यावर्षी आतापर्यंत 3 शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. त्यांपैकी मदतीसाठी केवळ 173 शेतकरी आत्महत्याच शासनाने पात्र ठरविल्या तर 127 आत्महत्यांची प्रकरणे अपात्र ठरविली. त्यांना अजूनही न्याय मिळालेला नाही.
हेदेखील वाचा : Jalgaon Crime News: जळगावात सैराटची पुनरावृत्ती; प्रेमविवाह केल्याच्या रागातून जावयाला संपवलं
जिल्ह्यात 2001 ते डिसेंबर 2024 या काळात तब्बल 301 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. कुणी गळफास घेतला, कुणी विषारी औषध प्राशन केले, कुणी विहिरीत, तलावात उडी घेत जीवनप्रवास थांबविला. विविध समस्यांच्या चक्रव्युहात साडपलेला शेतकरी आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल उचलतो. शेतकरी आत्महत्या झालेल्या कुटुंबाला मदत करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने नेमलेल्या समितीसमोर शासनाने लावलेल्या जाचक अटींमुळे जिल्ह्यातील अपात्र 127 आत्महत्याग्रस्त कुटुंबांना अद्यापही न्याय मिळू शकला नाही.
जिल्ह्यात 2015 व 16 यावर्षी सर्वाधिक आत्महत्या झाल्या. दोन वर्षांतील 62 आत्महत्यांपैकी केवळ 20 पात्र ठरल्या असून 42 अपात्र ठरविण्यात आलेल्या आहेत. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाला शासनाकडून 1 लाख रुपयांची मदत मिळते. जिल्ह्यात आतापर्यंत 1 कोटी 73 लाख रुपये शासनातर्फे पात्र असलेल्यांना देण्यात आले आहेत.
जुलैमध्ये तिघांची आत्महत्या
जिल्ह्याची अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून आहे. त्यातही निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा चुराडा होतो. त्यामुळे हताश होऊन शेतकरी मृत्यूला कवटाळत आहेत. 2024 या वर्षभरात एकूण 5 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यात जुलै, ऑगस्ट आणि डिसेंबरमध्ये या तीन महिन्यात प्रत्येकी एका शेतकऱ्याचा समावेश आहे. याप्रकरणी 4 शेतकऱ्यांचे अर्ज मदतीसाठी पात्र ठरविण्यात आले असून, एक अर्ज चौकशीसाठी प्रलंबित आहे.
निसर्गाच्या प्रकोपामुळे शेतकरी आत्महत्या करत आहेत. मात्र, आत्महत्या हा अंतिम पर्याय नाही. त्यांनी संयम बाळगून परिस्थितीशी दोन हात करावे. आत्महत्याग्रस्त कुटुंबांसोबत शासन असून, त्या कुटुंबांना चौकशीअंती मदत केली जात आहे.
– राजन चौबे, आपत्ती व्यवस्थापन.