गर्भवतीची चिमुकलीसह विहिरीत उडी (फोटो सौजन्य-X)
यवतमाळ : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. त्यातच यवतमाळमध्ये धक्कादायक घटना समोर आली. एका गर्भवती महिलेने दोन वर्षीय चिमुकलीसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. या घटनेत त्या चिमुकलीसह तिच्या आईचा दुर्दैवी मृत्यू झाला. एवढेच नव्हे तर मातेच्या उदरात वाढत असलेल्या नवजात बाळाचाही जग पाहण्याअगोदरच मृत्यू झाला.
लाडखेड पोलिस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या ब्रह्मी गावात मंगळवारी (दि. १२) सकाळी ११ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. पूजा मोहन नेमाने (२५), नव्या मोहन नेमाने (२) (रा. ब्रह्मी) अशी मृत मायलेकीची नावे आहेत. मंगळवारी पूजाने आपल्या लेकीला शेल्याने पोटाला घट्ट बांधले. त्यानंतर दोघींनी गावालगतच्या शेतातील विहिरीत उडी घेतली. अल्पावधीतच पाण्यात श्वास गुदमरून दोघींचा मृत्यू झाला. ही बाब लक्षात येताच ग्रामस्थांनी धाव घेऊन त्या दोघींनाही वाचविण्याचे आटोकाट प्रयत्न केले. मात्र, तोपर्यंत उशीर झाला होता.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच लाडखेड पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी नागरिकांच्या मदतीने दोघींचेही मृतदेह पाण्याबाहेर काढले. तसेच पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठविले.
आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट
महिलेने लेकीसह आत्महत्या करण्याचे कारण अद्यापही अस्पष्ट आहे. मात्र, तिच्या कुटुंबात काहीसा वाद झाल्याची चर्चा घटनेनंतर नागरिकांत होती. लाडखेड पोलिसांनी तूर्तास याप्रकरणी आकस्मित मृत्यूची नोंद केली आहे.
क्षणात झालं होत्याचं नव्हतं…
लाडखेड पोलिस ठाण्याअंतर्गत येणारे ब्रह्मी हे आडवळणावरील गाव. या गावात पूजाचा नेटका संसार सुरू होता. तिच्या संसारवेलीवर नव्या नामक कन्यारत्नही फुलले. त्यानंतर पुन्हा ती गर्भवती राहिली. लवकरच नवीन पाहुणा घरात येणार असल्याने कुटुंबीय आनंदात होते. मात्र, पूजाने अचानक टोकाचा निर्णय घेत चिमुकल्या नव्याला पोटाशी बांधून विहिरीत उडी घेतली. त्यामध्ये त्या दोघींचा मृत्यू झाला. शिवाय गर्भात वाढत असलेले बाळही निःश्वास झाले.