File Photo : Accused Akshay Shinde
मुंबई : बदलापूरमधील एका नामांकित शाळेत दोन लहान मुलींवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली. यानंतर जनतेमध्ये संतापाची प्रचंड लाट उसळली आहे. असे असताना यातील आरोपी अक्षय शिंदे याला पोलिस कोठडी सुनावली आहे. यामध्येच आरोपी अक्षय शिंदे याची तीन लग्ने झाल्याची माहिती मिळत आहे.
हेदेखील वाचा : बदलापूर अत्याचारप्रकरणी आरोपी अक्षय शिंदेला 26 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी
एका शाळेत शिपाई म्हणून कामावर असलेल्या अक्षय शिंदेने दोन मुलींवर अत्याचार केला. याप्रकरणी सध्या तो अटकेत आहे. आता त्याच्या घराची अज्ञात व्यक्तींकडून तोडफोड करण्यात आली. तसेच अक्षयची तीन लग्ने झाली होती आणि त्याच्या तिन्ही बायका त्याला सोडून गेल्याची माहिती त्याच्या शेजारांनी दिली.
अक्षय शिंदे आपल्या कुटुंबासह बदलापूरमधील खरवई या गावात राहतो. तेथे त्याचे घर आहे. परंतु, घृणास्पद कृत्य केल्यानंतर त्याचा नाहक मन:स्ताप त्याच्या कुटुंबालाही सहन करावा लागत आहे. अक्षयच्या कुटुंबाला गावातून बाहेर काढण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, घराला बाहेरून कुलूप होते. पण, लोकांनी घराच्या काचा फोडून आतील सामानाचीही तोडफोड केली. अक्षयचे नातेवाईकही अक्षयच्या शेजारी राहत होते. त्यांच्याही घराची तोडफोड गावकऱ्यांनी केली.
कुटुंब गायब
तोडफोडीनंतर आरोपी अक्षयचे कुटुंब सध्या खरवई बदलापूर या गावातून गायब आहे. अक्षयच्या शेजारी राहणाऱ्या काही महिलांची चर्चा केली असता त्यांनी अक्षयचे तीन वेळा लग्न झाल्याची माहिती दिली. त्याच्या तिन्ही बायका त्याच्यासोबत राहत नाहीत, असेही शेजाऱ्यांनी बोलताना सांगितले.
‘त्या’ शाळा परिसरात पोलिसांचा चोख बंदोबस्त
बदलापूर येथील शाळेची तोडफोड केल्यानंतर येथील परिस्थिती तणावपूर्ण झाली होती. मंगळवारी आंदोलन चांगलेच चिघळले. दरम्यान, बुधवारी बदलापुरात पोलिसांनी आंदोलकांची धडपकड सुरु केली होती. तसेच शाळा परिसरातही पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.