Photo Credit - social media
बदलापूर: बदलापूरच्या घटनेपासून राज्यभरात संतापाचे वातावरण आहे. आरोपीला लवकरात लवकर आणि फाशीचीच शिक्षा व्हावी यासाठी संपूर्ण बदलापूर रस्त्यावर उतरले होते.या प्रकरणातील आरोपीला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.अशातच आरोपी अक्षय शिंदेंच्या वडीलांनी आपल्या मुलाला फसवले जात असल्याचा दावा केला आहे. यामुळे आता या प्रकरणला वेगळेच वळण लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी अक्षय शिंदेच्या वडीलांनी पोलीस ठाण्यात जाऊन त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना मारहाण केल्याची तक्रार दिली आहे. तसेच,अक्षयची पुन्हा वैद्यकीय चाचणी करण्यात यावी. वैद्यकीय तपासणीतून अक्षयच्या निर्दोष असल्याचा पुरावा मिळू शकतो, असाही दावा आरोपी अक्षय शिंदेच्या वडीलांनी केला आहे.
हेदेखील वाचा: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक नवा सर्व्हे; निवडणुकांसाठी कसा आहे जनतेचा कल? ‘हे’ आहेत मोठे मुद्दे
त्याचबरोबर अक्षयच्या आईनेही काही दावे केले आहेत. अक्षयला कामाला लागून केवळ 15 दिवस झाले होते. 13 ऑगस्टला घटना घडली. पोलिसांनी 17 तारखेला अक्षयला अटक केली. शाळेत काम करणाऱ्या एका बाईने, पोलीस अक्षयला घेऊन गेल्याचे सांगितले. तेवढीच माहिती आमच्याकडे आहे. पोलिसांनी आमच्या लहान मुलालाही मारहाण केली, असा दावा आरोपी अक्षयच्या आईने केला आहे.
या घटनेनंतर बुधवारी अक्षय शिंदे राहत असलेल्या खरवई गावातील गावातील ग्रामस्थही आक्रमक झाले. खरवईपासून काही अंतरावर असलेल्या एका चाळीत अक्षय शिंदेचे कुटुंब राहते. ही घटना उघडकीस येताच गावातील ग्रामस्थांनी घरात घुसून त्याच्या कुटुंबीयांना घराबाहेर काढले, त्यांच्या सामानाचीही तोडफोड केली. गावकऱ्यांनी अक्षय शिंदेच्या कुटुंबियांना घरातून हाकलून देत गाव सोडण्यास जबरदस्ती केल्याचे सांगितले जात आहे.
हेदेखील वाचा: वेदा आणि खेल खेल में चित्रपट बॉक्स ऑफिसवर वाईट स्थितीत! जाणून घ्या 8व्या दिवसाची कमाई
धक्कादायक म्हणजे, ज्यावेळी ग्रामस्थांनी अक्षय शिंदेच्या घरावर हल्ला केला, त्यावेळी त्याच्या घरात लहान मुलांची खेळणीही आढळून आली. त्यामुळे ही खेळणी कुठून आली,असाही सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे. याप्रकऱणाचा तपास करण्यासाठी एसआयटी पथक नेमले जाणार असल्याची माहिती आहे.