फोटो सौजन्य- iStock
बंगळुरुमध्ये CGST च्या अधिकाऱ्यांनी अतिशय धक्कादायक प्रकार केला. त्यांनी व्यावसायिकाकडून खंडणी आणि त्याचे अपहरण केल्याचा आरोप करण्यात आला. त्या अधिकाऱ्यांवर आता कडक कारवाई केली गेली आहे. बंगळुरुमधील CGST अधिकाऱ्यांना केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाने निलंबित केले आहे. या अगोदरच बंगळुरू शहर गुन्हे शाखेने बगळुरूमधील बायप्पानहल्ली पोलिस ठाण्यात एका व्यावसायिकाने अपहरण आणि खंडणीच्या तक्रारीच्या आधारे दिंनाक 11 सप्टेंबर रोजी 4 केंद्रीय वस्तू आणि सेवा कर (CGST) अधिकाऱ्यांना अटक केली होती. अटक करण्यात आलेल्यांमध्ये जीएसटी निरीक्षक आणि वरिष्ठ गुप्तचर अधिकारी दर्जाच्या कर्मचाऱ्यांशिवाय एका अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याचाही समावेश आहे. असे CBIC (Central Board of Indirect Taxes and Customs) ने सांगितले. अभिषेक, मनोज, नागेश बाबू आणि सोनाली अशी अटक झालेल्यांची नावे आहेत.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर एका पोस्टमध्ये CBIC ने म्हटले आहे की, बंगळुरूमधील काही CGST अधिकाऱ्यांनी कथित खंडणीचा अवलंब केला आहे. संबंधित अधिकाऱ्यांना तत्काळ निलंबित करण्यात आले आहे.सीबीआयसीने स्पष्ट केले की, ज्या अधिकाऱ्यांना रिमांडवर घेतले आहेत ते पोलिस अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत. तपासाच्या निकालाच्या आधारे याप्रकरणी पुढील कारवाई केली जाईल. सीबीआयसी पारदर्शक आणि व्यवसाय-अनुकूल कर प्रशासनासाठी वचनबद्ध आहे.
मीडीया रिपोर्ट्नुसार, अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अटक केलेल्या या चार जीएसटी अधिकाऱ्यांविरुद्ध मनी लाँड्रिंगचा गुन्हाही नोंदवला आहे. ईडीचा अधिकारी असल्याचे दाखवून येथील एका व्यावसायिकाकडून दीड कोटी रुपये उकळल्याचा आरोप त्याच्यावर आहे. बेंगळुरू शहर गुन्हे शाखेने आरोपींविरुद्ध दाखल केलेल्या एफआयआरची दखल घेत त्यांच्याविरुद्ध मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याची (पीएमएलए) कलमे लावण्यात आली आहेत. हे चारही लोक बनावट छापे टाकण्यासाठी व्यावसायिकाकडे गेले होते आणि त्यांनी आपण ईडीकडून असल्याचा दावा केला आणि त्याला धमकी देऊन तब्बल दीड कोटी रुपये उकळले.
नेमक प्रकरण ?
पोलिसात दाखल केलेल्या तक्रारीनुसार 31 ऑगस्टला आरोपी जीवन हा मेक्सो सॉल्यूशंस प्राइवेट कंपनीचे मालक केशव टाक यांच्या घरी पोहचला आणि स्वत:ला ईडी आणि जीएसटीचा अधिकारी असल्याचे सांगितले, त्यानंतर केशव यांच्या घरात असलेल्या सदस्यांना जबरदस्तीने कारमध्ये टाकले त्यांचे फोन आणि इतर सामान जप्त केले. त्यांच्यावर अवैधरितीने कंपनी चालविल्याचे आरोप केले. त्यानंतर त्या अधिकाऱ्यांनी या सर्वांना कार्यालायात आणून मारहाण केली. त्यांना एका वेगळ्या खोलीत बंद करण्यात आले.
जीएसटीचा वरिष्ठ अधिकारी असल्याचे सांगणाऱ्या मनोजने व्यापारी केशवला इंदिरानगर येथे नेऊन कंपनीचे मालक केशव यांना मारहाण केली. तसेच केशवचे मित्र रोशन जैन यांना व्हॉट्सॲपवर फोन करून ३ कोटी रुपये आणण्याची मागणी केली होती, मात्र रोशन 3 कोटी आणू शकला नाही. यानंतर 1 सप्टेंबर रोजी पहाटे 2.30 वाजेपर्यंत रोशनने 1.50 कोटी रुपयांची व्यवस्था केली होती. त्यानंतर आरोपी अधिकारी हे दीड कोटी रुपये घेऊन फरार झाले.