File Photo : Crime
शिक्रापूर : कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथील एका व्यावसायिकाने खासगी सावकारांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना घडली. किरण सुरेश कुलकर्णी (वय ४८ रा. कोरेगाव भीमा ता. शिरुर) असे आत्महत्या केलेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. याबाबत महेश सुरेश कुलकर्णी (वय ४४ रा. कोरेगाव भीमा ता. शिरुर) यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी 11 जणांवर गुन्हे दाखल केले याहेत.
नवनाथ भंडारे, संतोष भंडारे, संदीप अरगडे (तिघे रा. वढू बुद्रुक ता. शिरुर) सुधाकर कांतीलाल ढेरंगे, कांतीलाल रामचंद्र ढेरंगे, अमोल गव्हाणे (तिघे रा. कोरेगाव भीमा ता. शिरुर) शांताराम सावंत (रा. वाडागाव ता. शिरुर) अजय यादव, जनार्धन वाळूंज (रा. लोणीकंद ता. हवेली) जातेगाव खुर्दचे माजी सरपंच किशोर खळदकर (रा. जातेगाव खुर्द ता. शिरुर), मामा सातव (रा. वाघोली ता. हवेली) या अकरा जणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हे दाखल केले आहेत.
कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथील किराणा व्यावसायिक किरण कुलकर्णी हे वैष्णवी सुपर मार्केट नावाने व्यवसाय करत होते. कोरोना काळामध्ये व्यवसाय अडचणीत आल्यानंतर किरण यांनी काही खासगी सावकारांकडून व्याजाने पैसे घेतले. किरण यांनी गावातील सुधाकर ढेरंगे व कांतीलाल ढेरंगे यांच्या सोबत भागीदारीमध्ये इमारत बांधली होती. बरेच दिवस खासगी सावकारांना व्याज दिल्याने किरण अडचणीत आले होते. त्यांनी ढेरंगे यांच्या सोबत भागीदारीत असलेली सदनिका व गाळा विक्रीचा निर्णय घेतला. मात्र त्या खरेदीसाठी व्यक्ती आल्यास ढेरंगे त्यांना ती इमारत घेऊ देत नव्हता. तसेच झालेले व्यवहार मोडत होते. मात्र ज्या खासगी सावकारांकडून किरण यांनी पैसे घेतले ते सर्वजन त्यांना मानसिक त्रास देत दमदाटी करत होते.
भिमा नदीच्या पाण्यात संपविले जीवन
सावकार आणि ढेरंगे यांच्या त्रासाला कंटाळून किरण कुलकर्णी यांनी भिमा नदीच्या पाण्यात आत्महत्या केली. या घटनेबाबत महेश कुलकर्णी यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पुढील तपास पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे व प्रतिक जगताप हे करत आहे.