सौजन्य - सोशल मिडीया
पुणे : राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण प्रचंड वाढत चाललं आहे. पुण्यात एक दिवसाआड महिला अन् मुलींवर अत्याचाराच्या घटना समोर येताना आपल्याला दिसत आहे. पुण्यातील बोपदेव घाटामध्ये ३ ऑक्टोबर रोजी तरुणीवर सामूहिक अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. आता या प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलं आहे.
बोपदेव घाटात २१ वर्षीय तरुणीवर सामूहिक अत्याचार प्रकरणात तीस तासांनंतरही आरोपींचा तपास लागलेला नाही. तीन आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची २५ पथके वेगवेगळ्या दिशेने रवाना झाली आहेत. दरम्यान, एका सीसीटीव्ही फूटेजमध्ये तिघे जण दिसत असून पोलिसांनी त्यादृष्टीने तपास सुरू केला आहे. घटनेनंतर १५ मिनिटांनी हे संशयित पुढे जाऊन थांबले असावेत असा संशय पोलिसांना आहे.
याबाबत मिळालेली माहिती असी की, सामूहिक अत्याचार प्रकरण उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फूटेज, तांत्रिक डाटाच्या मदतीने तपास सुरू केला आहे. जिथं घटना घडली तिथं मोबाइलला रेंज नाही. याशिवाय दहा किमी अंतराच्या परिसरात सीसीटीव्हीसुद्धा नसल्यानं तपासात अडथळा येत आहे.
नेमकी घटना काय?
एक मित्र आणि त्याची मैत्रीण गुरुवारी रात्रीच्या सुमारास बोपदेव घाटावर फिरण्यासाठी गेले होते. त्यावेळी तिथे तीन अज्ञात तरुण आले. त्या तिघं नरधमांनी फिरण्यासाठी आलेल्या त्या मुलाला आणि मुलीला धमकावलं. त्यांनी या मुलाला त्याचे कपडे काढून, त्याला शर्टने आणि बेल्टने झाडाला बांधून ठेवलं. त्यानंतर तिघांनी मुलीवर अत्याचार केले. या संपूर्ण घटनेनं पुणे शहर पुन्हा एकदा हादरलं आहे. त्यानंतर बांधलेल्या मुलाला तिघांनी मारहाण केली. हा संपूर्ण प्रकार पोलिसांना समजल्यानंतर त्यांनी रुग्णालयात जाऊन या धक्कादायक प्रकरणाची चौकशी करत तपास सुरू केला. त्यानंतर अंगावर शहारे आणणारा हा प्रसंग पोलिसांनी माध्यमांशी बोलताना सांगितला.