Photo Credit- Social Media (सलमान खानला धमकीचा मेसेज)
मुंबई: कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोई गँगच्या कारवाया थांबण्याचे नाव घेत नाहीयेत. एकीकडे लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोईच्या प्रत्यार्पणाची तयारी सुरू असतानाच मुंबईतून पुन्हा एकदा धक्कादायक बातमी समोर आली आहे. अभिनेता सलमान खानला बिश्नोई गँगने पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी दिल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई वाहतूक पोलीस विभागाच्या कंट्रोलरुमला हा मेसेज आल्याचे सांगण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई वाहतूक नियंत्रण कक्षाला आलेल्या मेसेजमध्.े लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ बोलत असल्याचे सांगत त्याने ही धमकी दिली आहे. “अभिनेता सलमान खानला जिवंत राहायचं असेल तर त्याने मंदीरात जाऊन माफी मागावी, नाहीतर पाच कोटी रुपये द्यावेत. न दिल्यास सलमान खानला जीवे मारू, आमची गॅग आजही सक्रिय आहे.” अशी धमकी या मेसेजमध्ये देण्यात आली आहे. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी या मेसेजची दखल घेत गुन्हा दाखल केला असून त्याचा शोधही सुरू केला आहे. दरम्यान, एप्रिल 2024 मध्येही बिश्नोई गँगकडून सलमान खानच्या घरावर गोळीबार करण्यात आला होता. त्यानंतर गेल्या महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्धिकी यांचीही हत्या करण्यात आली.त्यामुळे सलमान खानची सुरक्षाही वाढवण्यात आली होती.
गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई सध्या साबरमती मध्यवर्ती कारागृहातील उच्च सुरक्षा वॉर्डमध्ये ठेवण्यात आला आहे. पण त्याने आपले जाळे अशा प्रकारे पसरवले की तो तुरुंगात असो की बाहेर याने त्याला फारसा फरक पडत नाही. याचा अर्थ असा की, तुरुंगात बसून तो अगदी सहजतेने वाटेल ते करतो. तुरुंगात बसून तो आपल्या शत्रूंच्या नावे कंत्राटे घेतो आणि तुरुंगात बसून करोडो रुपये वसूल करतो.
सलमान खानच्या घरावर गोळीबार कऱण्याची जी घटना घडली होती. त्यामागे लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोईचा हात होता. गेल्या काही वर्षांपासून तोही फरार आहे. अमेरिकेत लपून बसल्याची माहिती समोर आल्यानंतर अमेरिकेनेही त्याच्या प्रत्यार्पणाची तयारी सुरू केली आहे.
हेही वाचा: “बंडखोरांनी अर्ज मागे घ्यावा…”, उद्धव ठाकरेंची ‘या’ 5 बड्या नेत्यांवर निलंबनाची कारवाई
महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (MCOCA) न्यायालयाने यापूर्वीच अनमोल बिश्नोईच्या अटकेसाठी अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे आणि त्याच्या परदेशात शोध घेण्यासाठी रेड कॉर्नर नोटीसही जारी केली आहे.रेड कॉर्नर नोटीस ही इंटरपोल सदस्य देशांना वॉन्टेड गुन्हेगार शोधून अटक करण्याची विनंती आहे. वॉरंट व्यतिरिक्त, प्रत्यार्पणाची प्रक्रिया औपचारिक करण्यासाठी पोलिसांना न्यायालयीन कागदपत्रांची आवश्यकता आहे. क्राईम ब्रँचचा अर्ज 16 ऑक्टोबर रोजी मकोका कोर्टाने मंजूर केला असून, आवश्यक कागदपत्रे लवकरच मिळण्याची प्रक्रियाही सुरू झाली आहे.
एनआयएने अनमोल बिश्नोईवर 10 लाख रुपयांचे बक्षीस ठेवले आहे, कारण त्याच्यावर 18 गुन्हे दाखल आहेत. 2022 मध्ये पंजाबी गायक सिद्धू मूसवाला यांच्या हत्येत अनमोलचाही हात होता, असेही एजन्सीने म्हटले आहे. त्याने आरोपींना शस्त्रे आणि इतर मदत केल्याचा आरोप आहे.
हेही वाचा: ऐन विधानसभा निवडणुकीत ‘या’ दोन नेत्यांनी सोडली शरद पवारांची साथ; अपक्ष उभं राहत उमेदवारी ठेवली कायम