शेतकऱ्याची कर्जबाजारी गळफास घेत आत्महत्या
पैठण : सध्या वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल होताना दिसत आहे. ऐन ऑक्टोबरमध्ये पावसााच अनुभव राज्यातील जनतेला येत आहे. याचा वातावरण बदलाचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. सततची नापिकी व अतिवृष्टीने पिकांचे मोठे नुकसान होत आहे. असे असताना याच नैराश्येपोटी कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने आत्महत्या केली.
पैठण तालुक्यातील आडूळ येथील ४७ वर्षीय एका अल्पभूधारक शेतकऱ्याने स्वतःच्या घरात दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी (दि २७) रोजी दुपारच्या सुमारास घडली. बाबासाहेब भानुदास जंगले असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. दरम्यान, पाच दिवसांत पैठण तालुक्यात तीन शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणाने आत्महत्या केल्याच्या घटनांनी सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. बाबासाहेब जंगले यांची आडूळ शिवारात गट क्र २५५ मध्ये १ एकर शेती असून मोलमजुरी करून ते आपल्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाह चालवित होते. या वर्षी झालेल्या अतिवृष्टीने पिकांचे अतोनात मोठे नुकसान झाले होते.
शेतीच्या उत्पन्नातून झालेला खर्च सुद्धा निघाला नसल्याने त्यांच्यावर बँकेचे व मायक्रो फायनान्सच्या कर्जाचा मोठा डोंगर वाढतच गेल्याने ते मागील काही दिवसांपासून सतत चिंताग्रस्त राहत होते. सद्यस्थितीत अतिवृष्टीने शेतातील पिकांचे नुकसान झाल्यानंतर हवालदिल झालेल्या या शेतकऱ्याने सोमवारी दुपारी टोकाची भूमिका घेऊन त्यांच्या स्वतःच्या मालकीच्या घरात पंख्याला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.
घराचा दरवाजा ठोठावला पण…
लवकर त्यांच्या घराचा दरवाजा उघडला नसल्याने आजूबाजूच्या रहिवाश्यानी आतमध्ये डोकावून पाहिले असता त्यांना जंगले या शेतक-याचे प्रेत लटकलेले अवस्थेत आढळून आले. आडूळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात त्यांच्यावर शवविच्छेदन करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, आई असा परिवार आहे. या घटनेची नोंद पाचोड पोलिस ठाण्यात घेण्यात आली आहे.
आर्थिक विवंचनेतून शेतकऱ्याची आत्महत्या
राज्यातील अनेक भागांत मुसळधार पाऊस झाला. या मुसळधार पावसामुळे सर्व पीक वाहून गेले. त्यामुळे आता मुलाचे पुढचे शिक्षण व घरातील सर्व कामे आर्थिक विवंचनेतून खोळंबतील. या विचारांनी मागील दोन दिवसांपासून तणावात असलेल्या मधुकर सर्जेराव पळसकर (रा. मौजे बकापूर) यांनी काही दिवसांपूर्वीच शेतातील विहिरीजवळ झाडाला गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. हा प्रकार उघडकीस आल्यावर त्यांना मिनी घाटी रुग्णालयात दाखल केले.
हेदेखील वाचा : दागिने चोरीसंदर्भात पोलिसांकडून कारवाई होत नसल्याने एकाचा आत्मदहनाचा प्रयत्न; अंगावर पेट्रोल ओतलं अन्…






