फोटो सौजन्य: iStock
मिरजगाव पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रहास पांडुळे (रा. घुमरी, ता. कर्जत) यांनी शेती व दूध व्यवसायासाठी विविध बँकांकडून कर्ज घेतले होते. वाढता आर्थिक बोजा कमी करण्याच्या उद्देशाने त्यांनी सुमारे १८ महिन्यांपूर्वी गावातील खासगी सावकार प्रशांत अनभुले याच्याकडून दीड लाख रुपये व्याजाने घेतले होते.
दोन महिन्यांपूर्वी चंद्रहास पांडुळे यांनी व्याजापोटी १ लाख ४५ हजार रुपये रोख स्वरूपात सावकाराला दिले होते. मात्र, तरीही प्रशांत अनभुले याच्याकडून सतत पैशांचा तगादा लावला जात होता. दरम्यान, चंद्रहास यांनी काही बँकांचे कर्ज फेडले असल्याचेही पोलिस तपासात समोर आले आहे.
८ जानेवारी रोजी खासगी सावकाराच्या धमक्यांमुळे भयभीत झालेल्या चंद्रहास पांडुळे यांनी घरातील कोणालाही काही न सांगता घर सोडले. त्याच दिवशी सायंकाळी सुमारे ८ वाजता प्रशांत अनभुले, अनिल पंढरीनाथ अनभुले आणि पप्पू तनपुरे हे चौघे चारचाकी वाहनातून पांडुळे यांच्या घरी आले. यावेळी प्रशांत अनभुले याने घराबाहेर बोलावून फिर्यादीला सांगितले की, चंद्रहासकडून अजूनही १.५ लाख रुपये व्याज बाकी असून, पैसे न दिल्यास त्याला उचलून नेण्यात येईल. तसेच चंद्रहासच्या मागावर माणसे लावल्याची धमकीही दिली.
चंद्रहास यांचा मोबाईल फोन बंद असल्याने नातेवाइकांनी सर्वत्र शोध घेतला; मात्र ते कुठेही सापडले नाहीत. अखेर आष्टी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असतानाच, ९ जानेवारी रोजी दुपारी २ वाजता ऋषी थोरवे (रा. घोगरगाव) यांनी माहिती दिली की, मांदळी गावच्या शिवारात वनविभागाच्या हद्दीतील गौरी शंकर महादेव मंदिराजवळ एका व्यक्तीचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला आहे.
मिरजगाव पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तपास केल्यानंतर मृत व्यक्ती चंद्रहास पांडुळे असल्याचे निष्पन्न झाले. खासगी सावकार प्रशांत अनभुले याने केलेल्या सततच्या मानसिक छळामुळे व धमक्यांमुळे चंद्रहास यांनी आत्महत्या केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा तपास कर्जत विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी प्रवीण लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली मिरजगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक विजय झंजाड व त्यांचे सहकारी करीत आहेत.






