धनंजय मुंडेंना दिलासा पण पोटगीची ४६ कोटींची रक्कम द्यावेच लागतील
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे आणि त्यांच्या कथित पत्नी करुणा शर्मा मुंडे यांच्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला वाद आता न्यायालयात गेला आहे. अलीकडेच न्यायालयाने करुणा मुंडेंना दिलासा देत, धनंजय मुंडे यांनी पोडगी (पोटगी) द्यावी असा आदेश दिला होता. मात्र, या निर्णयाविरोधात धनंजय मुंडे पुन्हा न्यायालयात गेले. या प्रकरणात गुरुवारी न्यायालयाने धनंजय मुंडेंना दणका दिला असून, आता त्यांना सुमारे ४८ लाख रुपये भरावे लागणार असल्याचा दावा करुणा मुंडे यांनी पत्रकार परिषदेत केला.
करुणा मुंडे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत माहिती दिली की, धनंजय मुंडे यांनी कनिष्ठ न्यायालयातील याचिका रद्द व्हावी म्हणून उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्या याचिकेवर न्यायालयाने मला दिलासा दिला आहे, असे त्यांनी सांगितले. “या निर्णयासाठी मी न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांचे आभार मानते,” असे त्या म्हणाल्या. “माझ्याकडील एकूण पोटगीची रक्कम सुमारे ३५ ते ४० लाख रुपये आहे. यातील ५० टक्के रक्कम म्हणजेच सुमारे २१ ते २२ लाख रुपये धनंजय मुंडे यांनी कोर्टात जमा करावी, असा आदेश न्यायालयाने दिला आहे. तसेच माझ्या मुलीसाठी १०० टक्के पोटगीची रक्कम भरण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत,” अशी माहिती त्यांनी दिली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप करत करुणा मुंडे म्हणाल्या, “धनंजय मुंडेंना मला पैसे द्यायचे नाहीत, त्यामुळेच ते कोर्टात गेले.” करुणा मुंडेंनी असा दावा केला की, “माझ्याकडे सुमारे ५० कोटी रुपयांची मालमत्ता होती, जी धनंजय मुंडेंनी विकायला लावली. निवडणुकीच्या काळात मी माझं मंगळसूत्रसुद्धा गहाण ठेवून त्यांना आर्थिक मदत केली. हे सर्व पैसे मी त्यांना दिले होते. धनंजय मुंडे यांना मी गेली २७ वर्षे ओळखते. त्यांना प्रत्यक्षात पैशांची गरज नाही. मात्र त्यांच्यामागे असलेल्या वाल्मीक कराड, तेजस ठक्कर यांच्यासारख्या गटांमुळे ते चुकीच्य मार्गाने जात आहेत,” असा आरोपही त्यांनी केला.
धनंजय मुंडे यांच्याविरोधात पत्रकार परिषदेत करुणा मुंडे यांनी भावनिक आणि आक्रमक प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या, “धनंजय मुंडे जेव्हा सहा वर्षं माझ्यासोबत या घरात राहत होते, तेव्हा ते कांदा-लसूणसुद्धा खायचे नाहीत. मात्र, काही दलाल त्यांच्या संपर्कात आले आणि त्यानंतर आमच्यात फूट पडली.त्यांनी एकदा तरी विचार करायला हवा होता. पण त्यांचं डोकं कुठं गेलं, हे मलाच कळेनासं झालं आहे. त्यामुळे मी त्यांना आवाहन करते की त्यांनी या दलालांचं ऐकू नये,” असंही त्या म्हणाल्या.
“मी त्यांच्यावर प्रेम करत होते आणि प्रेमिकेच्या नात्याने त्यांच्यासोबत राहत होते. मी आधी कधीच कोर्टात गेले नव्हते. त्यांनीच हा वाद कोर्टात नेला. इतकंच काय, त्यांच्या नावावर काय-काय प्रॉपर्टी आहे हे सुद्धा मला माहित नव्हतं.” पण आता, “धनंजय मुंडेंनी जर थोडी जरी लाज ठेवली असेल, तर निवडणुकीच्या काळात माझ्याकडून घेतलेले पैसे मला माघारी द्यावेत.” अशा टोलाही त्यांनी लगावला.