संग्रहित फोटो
पुणे : प्रवासी घेऊन निघालेली एसटी बस बंद पडल्यानंतर चालक अन् वाहकाने प्रवाशांना दुसऱ्या बसमधून पुढे पाठवले व स्वत: बसमध्ये झोपले. मात्र, चोरट्यांनी या बंद पडलेल्या बसमधील डिझेल चोरी करून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी एसटी बसचालक रमेश पोटभरे (वय ५२, रा. एसटी कॉलनी, पुणे-सातारा रस्ता) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानूसार चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, पोटभरे हे पिंपरी-चिंचवडमधील वल्लभनगर आगारातून १७ जून रात्री प्रवाशांसह तुळजापूरला निघाले होते. पुणे-सोलापूर महामार्गावर कुंजीरवाडी गावाजवळ एसटी बसमध्ये बिघाड झाला. त्यामुळे एसटी बसचालक पोटभरे आणि वाहकाने बस ताम्हाणे वस्ती परिसरातील एस फोर जी हॉटेलसमोर रात्री लावली. एसटी बस बंद पडल्याने त्यांनी प्रवाशांना दुसऱ्या बसमधून जाण्यास सांगितले. हॉटेलसमोरील मोकळ्या जागेत त्यांनी बस लावली.
तसेच, दोघेही झोपले. तेव्हा शेजारी एक टँकर लावण्यात आला होता. चोरट्यांनी मध्यरात्री एसटी बसच्या डिझेल टाकीचे झाकण उघडून त्यातील डिझेल चोरले, तसेच शेजारी लावलेल्या टँकरच्या टाकीचे झाकण उघडून चोरट्यांनी डिझेल चोरले. एसटी बस आणि टँकरमधून एकुण मिळून १८० लिटर डिझेल कॅनमध्ये भरुन चोरटे पसार झाले. चोरलेल्या डिझेलची किंमत ३० हजार रुपये असून, पोलीस हवालदार सातपुते अधिक तपास करत आहेत.