छातीवर, कपाळावर, पाठीवर..., नातेवाईकाने डॉक्टरवर केला चाकू हल्ला, डॉक्टरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर?
चेन्नई येथील कलैग्नार सेंटेनरी रुग्णालयातील एका डॉक्टरवर रुग्णाच्या एका नातेवाईकाने चाकुने हल्ला केल्याची धक्कादायक घटना बुधवारी समोर आली. या घटनेनंतर तमिळनाडूमधील डॉक्टरांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. रुग्ण्यालयात झालेल्या चाकूहल्ल्यामुळे डॉक्टरांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. रुग्णाच्या नातेवाईकांनी डॉक्टरांवर हल्ला करण्याची ही पहिलीच वेळ नाही. याविरोधात आता तमिळनाडूच्या सरकारी रुग्णालयातील डॉक्टर संतप्त झाले असून त्यांनी आंदोलनाला सुरुवात केली आहे. सरकारी रुग्णालयात डॉक्टरांची सुरक्षा वाढवावी, अशी मागणी डॉक्टरांकडून केली जात आहे. (फोटो सौजन्य – सोशल मिडीया)
हेदेखील वाचा- बाबा सिद्दीकींवर गोळी झाडल्यानंतर आरोपी हॉस्पिटलच्या बाहेर पोहोचला अन्…, चौकशीत धक्कादायक खुलासा
कलैग्नार सेंटेनरी रुग्णालयातील घटनेचा डॉक्टरांच्या संघटनेनी निषेध व्यक्त केला आहे. हॉस्पिटल प्रोटेक्शन ॲक्ट (HPA) अंतर्गत आरोपींवर कडक कारवाई करावी आणि हॉस्पिटलमध्ये पोलीस बंदोबस्त वाढवावा, अशी मागणी डॉक्टरांनी केली आहे. या मागणीसाठी डॉक्टरांनी आंदोलन देखील सुरु केलं आहे. मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरुच ठेवणार असल्याचा इशारा डॉक्टरांनी दिला आहे.
या घटनेनंतर रुग्णालयाबाहेर आंदोलन करणाऱ्या डॉक्टर आणि इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन यांची गाडी काही काळ थांबवली. डॉक्टरांच्या संघटनांसोबत झालेल्या बैठकीनंतर आरोग्य मंत्री मा सुब्रमण्यम यांनी सांगितले की, रुग्णालयात पोलीस चौकी उघडण्यात आली आहे. राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये सीसीटीव्ही बसवण्याबरोबरच अशा सुविधांचा अभाव असलेल्या ठिकाणी पोलीस चौकी सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मागण्या पूर्ण होईपर्यंत डॉक्टरांचा संप सुरुच राहणार असल्याचं सांगितलं जात आहे. बहुतांश युनियन बेमुदत संपावर आहेत. तर आयएमए संघटनेने एक दिवसीय आंदोलन पुकारले आहे. तामिळनाडू गव्हर्नमेंट डॉक्टर्स असोसिएशन (TNGDA) ने त्यांच्या सुरक्षिततेच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत आपत्कालीन सेवा आणि जीवनरक्षक प्रक्रिया वगळता सर्व OPD आणि वैकल्पिक शस्त्रक्रिया अनिश्चित काळासाठी थांबवण्याची घोषणा केली आहे.
हेदेखील वाचा- कलियुगातला नवसाला पावणारा देव म्हणजे महायुतीचे भरत गोगावले; सुरेश महाडीकांचे वक्तव्य
चेन्नई येथील कलैग्नार सेंटेनरी या सरकारी रुग्णालयात रुग्णाच्या एका नातेवाईकाने डॉक्टरवर चाकूने हल्ला केला. ज्या नातेवाईकाने हल्ला केला, त्याची आई रुग्णालयात उपचार घेत आहे. डॉक्टरवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचे नाव विघ्नेश आहे. तो चेन्नईचा रहिवासी आहे. त्याची आई कलैगनर सेंटेनरी हॉस्पिटलच्या कॅन्सर वॉर्डमध्ये दाखल आहे. बुधवारी डॉक्टर बालाजी काम करत असताना अचानक विघ्नेश आला आणि त्याने चाकूने हल्ला करण्यास सुरुवात केली.
हल्ल्यानंतर आरोपी तरुण तेथून पळून जाण्याचा प्रयत्न करत होता, मात्र रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. कॅन्सरग्रस्त आईसाठी डॉक्टरांनी चुकीचे औषध लिहून दिले होते. ते खाल्ल्यानंतर आईची तब्येत बिघडली, याच रागातून डॉक्टरांवर हल्ला केल्याचा दावा आरोपीने केला आहे. याप्रकरणी पोलीस तपास करत आहेत.