ऐन ऑक्टोबरमध्ये देशातील 'या' राज्यात मुसळधार पाऊस; तब्बल 1.46 लाख लोकांना फटका (फोटो- सोशल मिडिया)
नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल जाणवत आहे. काही ठिकाणी अद्यापही पाऊस होताना दिसत आहे. तर काही ठिकाणी ‘ऑक्टोबर हिट’चा सामना करावा लागत आहे. असे असताना आता तामिळनाडूला मात्र मुसळधार पावसाने झोडपून काढले. तामिळनाडूमध्ये सततच्या मुसळधार पावसामुळे अनेक भागात पाणी साचले आहे आणि अनेक जिल्ह्यांतील भात पिके पाण्याखाली गेली आहेत. या मुसळधार पावसाचा राज्यातील तब्बल 1.46 लाख लोकांना फटका बसला आहे.
चेन्नईतील जलाशयातील पातळीत झपाट्याने वाढ झाल्यानंतर तीन प्रमुख धरणांमधून पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. तर, हिमाचल प्रदेशातील उंचावरील भागात बुधवारी सकाळी हवामान बदलल्याचे पाहिला मिळाले. कुल्लूमध्ये मुसळधार पाऊस पडला आणि लाहौलमध्ये हंगामातील दुसरी बर्फवृष्टी झाली. आग्नेय अरबी समुद्रातील एक खोल कमी दाबाचा पट्टा पुढील 24 तासांत उत्तर-वायव्येकडे सरकेल. तामिळनाडू किनाऱ्याजवळ बंगालच्या उपसागरात आणखी एक कमी दाबाचा पट्टा पुढील 12 तासांत कमी दाबात रूपांतरित होण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे राज्यात आणखी पाऊस पडेल, असा अंदाज आहे.
याशिवाय, चेन्नई जलसंपदा विभागाने चेंबरंबक्कम, पूझल (रेड हिल्स) आणि पुंडी धरणांमधून अतिरिक्त पाणी सुरक्षितपणे समुद्रात वाहून नेण्यासाठी सतर्कतेने पाणी सोडण्यात येत आहे. यामुळे लोकांनी घाबरू नये असे आवाहन विभागाकडून करण्यात आले आहे.
मेत्तूर धरण तुडूंब भरले
राज्यातील सर्वात मोठे मेत्तूर धरण १२० फूट क्षमतेपर्यंत पोहोचले आहे. धरणातून ३६४८४ क्युसेक पाण्याची आवक सुरू आहे, तर ३५७४१ क्युसेक पाणी सोडले जात आहे. सततच्या पावसामुळे विल्लुपुरम बसस्थानक पाण्याखाली गेले होते, ज्यामुळे प्रवाशांना मोठी गैरसोय झाली. अनेक बसस्थानकाबाहेरून धावत होत्या, त्यामुळे प्रवाशांना पाण्यातून जावे लागले. चेन्नई पोलिस आणि महानगरपालिकेचे पथक रस्त्यांवरील पाणी काढण्याचे आणि पडलेली झाडे काढण्याचे काम करत असल्याचे दिसून आले.
ऐन दिवाळीत मुसळधार पाऊस
गेले काही दिवस देशभरात वातावरणात अनेक प्रकारचे बदल दिसून येत आहेत. मध्येच मुसळधार पाऊस कोसळत आहे. तर काही ठिकाणी कडकडीत उन्हाळा तर काही ठिकाणी थंडी पडण्यास सुरुवात झाली आहे. आता दिवाळीला सुरुवात झाली आहे. मात्र, ऐन दिवाळीत देखील काही राज्यांमध्ये पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे. तर काही ठिकाणी थंडी वाढण्याची शक्यता आहे.
हेदेखील वाचा : India Rain Alert: हा खेळ पावसाचा! ऐन दिवाळीत ‘या’ राज्यांना झोडपणार, पहा आजचे हवामान