जंजिरे वसई किल्ल्यावर शिवरायांच्या वेशातील कलाकारालाच अडवले; हिंदी भाषिक सुरक्षा रक्षक आला अन्...
वसईच्या ऐतिहासिक जंजिरे वसई किल्ल्यावर दीपोत्सवाच्या दिवशी एक अनपेक्षित घटना घडली. छत्रपती शिवाजी महाराजांचा पोशाख परिधान करून आलेल्या तरूणास फोटो काढण्यास मज्जाव करण्यात आला. तेथे कार्यरत सुरक्षा रक्षकाने त्या तरूणाला हिंदीतून बोलण्यास सांगत तसेच आपल्याला मराठी येत नाही, असे म्हणत उर्मटपणाही दाखवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर सोशल मीडियावर एकच चर्चा सुरु आहेत.
शिवरायांच्या वेशभूषेत आलेल्या त्या तरूणाने हिंदीचा आग्रह धरणाऱ्या सुरक्षा रक्षकाला चांगलेच फैलावर घेत मराठी येत नाही का तुला?, मराठी आलीच पाहिजे, मराठी येत नाही म्हणायचा आणि माज दाखवायचा हे चालणार नाही, अशा शब्दांत झापले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, तरूणाच्या भूमिकेचे कौतुक करण्यात येत आहे.
🚩वसई किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पोशाखात फोटोशूट करत होते,
तेव्हा एक परप्रांतीय आला म्हणतो — “मराठी येत नाही, इथे शिवाजी महाराजांच्या पोशाखात फोटो काढायचे नाही!”
जसा कॅमेरा ऑन केला, तसा सगळे शांत झाले!
मराठी अस्मिता जागी ठेवा! 🚩🔥#VasaiFort #MarathiPride pic.twitter.com/egkeIIUWJd — Abhishek Deshmukh -अभिषेक देशमुख (@ADeshmukh41138) October 21, 2025
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मंगळवारी वसई किल्ल्यावर झालेल्या दीपोत्सव कार्यक्रमादरम्यान ही घटना घडली. ‘किल्ले वसई मोहीम परिवार’ आणि ‘अनाम प्रेम महाराष्ट्र’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात शेकडो दिवे प्रज्वलित करून ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्यवीरांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
अनेक तरुणांनी नोदवला सहभाग
अनेक तरुणांनी शिवकालीन पोशाख परिधान करून सहभाग नोंदवला होता. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पोशाखात आलेल्या एका तरूणाला सुरक्षा रक्षकाने हटकले. तसेच हिंदीतून बोला, मला मराठी येत नाही, असा माज दाखवला. त्यानंतर शिवरायांच्या वेशातील त्या तरूणाने सुरक्षा रक्षकाचा माज उतरवला.
सोशल मीडियावर व्हिडिओ होतोय व्हायरल
याप्रकरणानंतर वातावरण तापले असून, याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनेक शिवप्रेमींनी यावर आपली प्रतिक्रिया देत संताप व्यक्त केला आहे. इतकेच नाहीतर काही शिवप्रेमींनी तर या तरुणाच्या भूमिकेवर समाधान व्यक्त करत संबंधित सुरक्षा रक्षकावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
हेदेखील वाचा : BMC Election: ‘मुंबई पालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंसोबत लढणार नाही’; काँग्रेसच्या बड्या नेत्याचा दावा