अकोल्यात भीषण अपघात (संग्रहित फोटो)
अकोल्यात भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रीय महामार्गावर बोरगाव मंजू पोलिस ठाण्याच्या हद्दीत हा अपघात झाला. पैलपाडानजीक अज्ञात वाहनाच्या धडकेत तिघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना ऐन दिवाळीत समोर आली. या अपघातात एक जण गंभीर जखमी झाला असून, या घटनेची माहिती मिळताच बोरगाव मंजू शहरात शोककळा पसरली. तर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.
मिळालेल्या माहितीनुसार, बोरगाव मंजू येथील धीरज शिरसाट (वय ३५) व त्यांची पत्नी अश्विनी शिरसाट (वय ३०) हे दोघेही आपले वाहन (छोटा हत्ती) क्रमांक (एमएच ३० एबी २००६) घेऊन मानकी (ता. कारंजा) येथे जात होते. दरम्यान पैलपाडानजीक सदर वाहनात बिघाड झाला. त्यामुळे त्यांनी पुढील प्रवासासाठी न जाता परतीच्या वाटेवर बोरगाव मंजू येथे येण्यासाठी दुसऱ्या वाहनचालकास मोबाईलवरून टो करून नादुरुस्त गाडी बोरगाव मंजू येथे घेऊन जाण्यासाठी बोलावले. आरिफ खाँ, अहेमद खाँ (वय २८), अन्वर खाँ अब्दुल खाँ (वय २५) हे दोघे नादुरुस्त गाडी जवळ पैलपाडा नजीक पोहोचले.
दरम्यान, समोरच्या टाटा गाडीत बसत असताना मूर्तिजापूरकडून बोरगाव मंजूकडे जाणाऱ्या एका अज्ञात मालवाहू वाहनाने भरधाव वेगाने आपल्या साईडला असलेल्या धीरज शिरसाट, अश्विनी शिरसाट, आरिफ खाँ व अन्वर खाँ या चौघांना जोरदार धडक दिली. या धडकेत घटनास्थळी क्षणातच धीरज शिरसाट, अश्विनी सिरसाठ, आरिफ खाँ (वय २८) हे गंभीर जखमी झाले व त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर अन्वर खाँ हे गंभीर जखमी झाले.
अपघाताने हिरावला कुटुंबाचा आधार
बोरगाव मंजू येथील धीरज शिरसाट, अश्विनी शिरसाट या दाम्पत्याला एक मुलगा प्रिन्स व एक मुलगी स्वरा अशी लहान असून, ती प्राथमिक शाळेत शिकत आहेत. तर धीरजचे आई-वडील वृध्द असल्याने दोन्ही लहान मुलांचा आधार हरपला आहे. दोघेही आपला छोटा व्यवसाय उभारून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. दरम्यान, ते व्यवसायाच्या निमित्ताने आपल्या वाहनाने कारंजाला जात असता सदर अपघात घडला. या अपघाताने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.