सौजन्य फोटो - सोशल मिडीया
रितेश आणि हितेश (नावे बदलली आहेत) हे दोघे पुण्यात वाहन खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतात. व्यवसायाच्या निमित्ताने त्यांची गेल्या नऊ-दहा वर्षांपासून घट्ट मैत्री होती. हितेशचे गॅरेजही होते. व्यवसायात आर्थिक अडचणी निर्माण झाल्यानंतर त्याने रितेशकडे आर्थिक मदत मागितली.
Accident News: सुपौलमध्ये भरधाव कारने कीर्तन करणाऱ्या भाविकांना चिरडले; ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू
मित्रावरील विश्वासापोटी रितेशने जून आणि जुलै २०१५ मध्ये बँकेतून पैसे काढून हितेशला ४ लाख ८५ हजार रुपये हातउसने दिले. दोन ते तीन महिन्यांत ही रक्कम परत करण्याचे हितेशने मान्य केले होते. मात्र, ठरलेली मुदत उलटूनही पैसे परत न मिळाल्याने रितेशने हितेशकडे पैशांची मागणी सुरू केली.
यानंतर जानेवारी २०१६ मध्ये हितेशने ४ लाख ८५ हजार रुपयांचा राष्ट्रीयकृत बँकेचा धनादेश दिला. मात्र, खात्यात पुरेशी रक्कम नसल्याने हा धनादेश अनादरित झाला. त्यानंतर दोघांमधील वाद वाढत गेला आणि अखेर हे प्रकरण न्यायालयात पोहोचले.
१६ मार्च २०१६ पासून सुरू झालेला न्यायालयीन संघर्ष तब्बल दहा वर्षे सुरू राहिला. या काळात पैशांच्या व्यवहारामुळे दोन्ही मित्रांमधील पूर्वीची घट्ट मैत्रीही दुरावली. एका पैशांच्या व्यवहारामुळे अनेक वर्षांचे नाते तुटण्याच्या मार्गावर गेले.
दहा वर्षांपासून सुरू असलेला हा वाद केवळ कायदेशीर मार्गाने न सोडवता मैत्रीच्या नात्यानेही मिटवता येईल, असा विचार दोन्ही पक्षांच्या वकिलांनी केला. फिर्यादीचे वकील ॲड. परीक्षित बडे आणि आरोपीचे वकील ॲड. सुधीर मुळे यांनी दोन्ही मित्रांमध्ये संवाद घडवून आणला.
दोन्ही बाजूंमध्ये चर्चा झाल्यानंतर परस्पर संमतीने तडजोड करण्याचा निर्णय घेण्यात आला. अखेर ४ लाख ८५ हजार रुपयांच्या व्यवहारावर अडीच लाख रुपयांत समझोता झाला आणि दहा वर्षांपासून सुरू असलेला न्यायालयीन वाद संपुष्टात आला.
Bhayandar Crime: भाईंदरमध्ये किरकोळ वादातुन तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
वाद मिटल्याची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रितेश आणि हितेश यांनी जुने मतभेद बाजूला ठेवले. दोघांनीही एकमेकांना गळाभेट दिली. दहा वर्षांनंतर पुन्हा एकत्र आलेल्या या मित्रांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. पैशांमुळे तुटलेले नाते अखेर संवाद आणि समजुतीमुळे पुन्हा जुळले. या घटनेने न्यायालयीन वादापलीकडेही मानवी नात्यांची किंमत अधोरेखित केली.






