पतीने पत्नीवर केला कुऱ्हाडीने वार (फोटो - istockphoto)
पुणे: तळजाई वसाहत परिसरात दारू पिण्यास पैसे न दिल्याने पतीने पत्नीवर कुऱ्हाडीने वार केल्याची घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी पतीला अटक केली.
पूनम दत्ता अडागळे (वय ३२, रा. खंडाळे चौक, तळजाई वसाहत, पद्मावती) असे गंभीर जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पती दत्ता राजाराम अडागळे (वय ३८) याला अटक करण्यात आली. याबाबत पूनम यांनी सहकारनगर पोलिसांत तक्रार दिली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, दत्ता याचा पूनमशी २०१५ मध्ये विवाह झाला असून, त्यांना ७ वर्षांचा मुलगा आहे. दत्ता काहीही काम करत नव्हता, तसेच त्याला दारूचे व्यसन आहे. पूनम घरकाम करतात. सोमवारी (३१ मार्च) रात्री आठच्या सुमारास दत्ता दारू पिऊन घरी आला. त्याने दारू पिण्यासाठी पूनमकडे पैसे मागितले. तिने पैसे देण्यास नकार. त्यानंतर चिडलेल्या दत्ताने घरातील कुऱ्हाडीने पूनमवर हल्ला केला. पूनमने आरडाओरडा केला. तेव्हा सासूने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. कुर्हाडीचा डोक्यात घाव बसल्याने पूनम या गंभीर जखमी झाल्या. दत्ताला पोलिसांनी अटक केली असून, अधिक तपास उपनिरीक्षक रेखा साळुंके तपास करत आहेत.
भरधाव दुचाकी घसरून तरुणाचा मृत्यू
वारजे माळवाडी परिसरात भरधाव दुचाकी घसरून सहप्रवासी तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर घडली आहे. याप्रकरणी दुचाकीस्वारावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. जय भगवान अवघड (वय २२, सध्या रा. अक्षरा पीजी. लक्ष्मी चौक, हिंजवडी फेज एक) असे मृत्यू झालेल्या सहप्रवासी तरुणाचे नाव आहे. अपघातात दुचाकीस्वार शुभम भाऊसाहेब काकडे (वय २४, सध्या रा. अक्षरा पीजी. लक्ष्मी चौक, हिंजवडी, फेज एक) जखमी झाला आहे. याबाबत जय याचे वडील भगवान सुखदेव अवघड (वय ४८,रा. वाकळुनी, ता. बदनापुर, जि. जालना) यांनी वारजे माळवाडी पोलिसांत तक्रार दिली आहे.
पुण्यात भीषण अपघात; भरधाव दुचाकी घसरून तरुणाचा मृत्यू
पोलिसांच्या माहितीनुसार, जय मूळचा जालना जिल्ह्यातील वाकळुनी गावचा रहिवासी आहे. रविवारी (३० मार्च) दुपारी साडेबाराच्या सुमारास दुचाकीस्वार शुभम आणि त्याचा मित्र जय हे मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावरुन निघाले होते. वारजेतील स्वीट कॉर्नर दुकानाजवळ भरधाव दुचाकीस्वार शुभमचे नियंत्रण सुटले. दुचाकी घसरल्याने सहप्रवासी जय याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली, तसेच दुचाकीस्वार शुभम जखमी झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी येथे धाव घेतली. दोघांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले. परंतु, उपचारांदरम्यान जयचा मृत्यू झाला. अधिक तपास उपनिरीक्षक नाईकवाडे करत आहेत.