अनैतिक संबंधाला अडथळा ठरणाऱ्या पतीचा झोपेतच खून; डोक्यात दगड घातला अन्... (File Photo : Crime)
पुणे : लोणी काळभोर येथील रायवाडी रोडवरील वडाळे परिसरात एका महिलेने तिच्या पतीची हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. अनैतिक संबंधाला अडथळा ठरणाऱ्या पतीचा घरासमोर झोपल्यानंतर झोपेत असतानाच प्रियकराच्या मदतीने डोक्यात दगड घालून खून करण्यात आल्याची घटना उघडकीस आली. लोणी काळभोर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत आरोपींना अटक केली.
रविंद्र काशीनाथ काळभोर (वय 45, रा. रायवाडी रोड, वडाळे वस्ती) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. लोणी काळभोर पोलिसांनी याप्रकरणी कारवाई करून तीन तासांत आरोपी गोरख त्र्यंबक काळभोर (वय ४१) व रवींद्र यांची पत्नी शोभा हिला बेड्या ठोकल्या आहेत. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, उपनिरीक्षक अनिल जाधव व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. पोलिसांनी खुनाचा अवघ्या तीन तासांत छडा लावून आरोपींना अटक केली.
रविंद्र हे वडाळे वस्तीत राहत होते. पत्नी शोभा व गोरख यांच्यात गेल्या काही महिन्यांपासून अनैतिक संबंध होते. पण, या संबंधाला रविंद्र हे अडथळा ठरत होते. त्यामुळे त्यांनी संगनमत करून त्यांना ठार मारण्याचा कट रचला. दरम्यान, घटनेच्या दिवशी म्हणजे, सोमवारी रात्री रविंद्र हे घराच्या दारासमोर झोपले होते. तेव्हा मध्यरात्री त्यांचा डोक्यात दगड घालून खून करण्यात आला होता.
दरम्यान, पहाटे शेजारच्या आजी झाडलोट करण्यासाठी बाहेर आल्या असता त्यांना रविंद्र हे रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसले. त्यानंतर खूनाचा प्रकार समोर आला. माहिती मिळताच वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, उपनिरीक्षक अनिल जाधव यांनी घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांना पत्नीवरच आला संशय अन्…
खूनाबाबत चौकशी सुरू केल्यानंतर पत्नीच्या वागण्यात तसेच बोलण्यात विसंगती लक्षात येत होती. ती घाबरत होती. तर परिसरात माहिती घेतल्यानंतर शोभा व गोऱख यांच्या अनैतिक संबंधाबाबत देखील पोलिसांना माहिती मिळाली. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. दोघांना पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली. तेव्हा आरोपींनी गुन्ह्याची कबूली दिली. रविंद्र अनैतिक संबंधात अडथळा ठरत असल्याने डोक्यात खोऱ्याच्या लाकडी दांडक्याने वार करून त्याचा खून केल्याची सांगितले.
…अन् आजीबाई थरथरल्या
रविंद्र काळभोर यांच्या घराशेजारी राहणाऱ्या एक आजीबाई नेहमीप्रमाणे पहाटे पाचच्या सुमारास दारात झाडलोट करण्यास बाहेर आल्या होत्या. त्यांनी झाडू घेऊन झाडझूड सुरू केली. पाण्याचा सडा टाकला आणि नेहमीप्रमाणे रविंद्र यांना उठवण्यासाठी त्यांच्याकडे गेल्या. पण रविंद्र यांचा रक्ताच्या थारोळ्यातील मृतदेह पाहून त्या थरथरल्याच. त्यांना काहीच सुचेनासे झाले. त्यांनी घाबरत-घाबरतच स्वत:च्या व रविंद्र यांच्या कुटुंबाना याची माहिती दिली. नंतर हा प्रकार समोर आला.