अंबरनाथ : ठाणे जिल्ह्यांमधून अनेक धक्कादायक घटना समोर येत आहे. मागील काही महिन्यांमध्ये अनेक घटना ठाणे जिल्ह्यामध्ये घडल्या आहेत. आता अंबरनाथमधील एक धक्कादायक घटना समोर आली आली आहे. मजुरीचे पैसे कमी देत असल्याच्या वादातुन मजुराने मुकादमाच्या डोक्यात हातोडा घालून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार अंबरनाथमध्ये घडला आहे. अंबरनाथ पूर्वेच्या वडवली सेक्शन परिसरामधील निर्माणाधिन इमारतीमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी शिवाजी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला पोलिसांनी अटक केली.
पूर्वेच्या वडवली सेक्शन परिसरातील दत्त साई कॉ. ऑप. हाऊसिंग सोसायटीच्या इमारतिचं पुनर्विकासाठी निष्कासन कार्य सुरू आहे. निर्माणाधिन इमारतीचे अंतर्गत पाडकाम सुरु असून याठिकाणी पश्चिम बंगाल राज्यातून आलेले तीन मजूर काम करून तिथेच राहत होते. त्यापैकी मुकादम असलेला अब्दुल रेहमान (३७) याची त्याच्या सोबत राहत असलेला मजूर सलीम शेख (४९) याने डोक्यात हातोडा घालून हत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत अब्दुल रेहमान, सलीम शेख आणि मोहम्मद अली हे तिघे पश्चिम बंगाल राज्यातील रहिवासी असून ते दत्त साई कॉ. ऑप. सोसायटीच्या इमारतीमध्ये काम करीत होते.
हेदेखील वाचा – मणिपूरमध्ये पुन्हा इंटरनेट बंदी; पाच जिल्ह्यांत इंटरनेट सेवा आणखी पाच दिवस राहणार ठप्प
मुकादम मालकाकडून ९०० रुपये घेऊन मजुरांना ७०० मजुरी देत असल्याच्या कारणावरून त्यांच्यात वाद झाला होता. हाच राग मनात धरून रविवारी पहाटे चार वाजताच्या दरम्यान आरोपीने मुकादमाच्या डोक्यात हातोडा मारून त्याला गंभीर जखमी केले. मृत अब्दुल रेहमान याला जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात मोहम्मद अली याने दिलेल्या फिर्यादीनुसार, हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी सलीम शेख याला अटक केली असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत यांनी दिली.