अकरावी प्रवेशाचे संकेतस्थळ ठप्प (Pic credit : social media)
इम्फाळ : मणिपूर राज्यात गेल्या काही महिन्यांपासून हिंसाचार वाढल्याचे पाहिला मिळत आहे. त्यातच मणिपूर हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर सरकारने राज्यातील पाच जिल्ह्यांच्या प्रादेशिक कार्यक्षेत्रातील मोबाईल इंटरनेट सेवेवरील बंदी आणखी पाच दिवस वाढवली आहे. आता या जिल्ह्यांमध्ये 20 सप्टेंबर दुपारी 3 वाजेपर्यंत इंटरनेट सेवा बंद राहणार आहे.
राज्य सरकारने सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर इंटरनेट सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला होता. पण नंतर ही बंदी मागे घेण्यात आली होती. मात्र, आता राज्य सरकारने मोबाईल इंटरनेट डेटा स्थगित ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. कारण अजूनही विविध सोशल मीडियाद्वारे चुकीची माहिती आणि खोट्या अफवा पसरवण्याची शक्यता आहे. मणिपूर सरकारचे आयुक्त (गृह) यांनी रविवारी मोबाईल इंटरनेट सेवेवरील बंदी वाढवण्याबाबत एक आदेश जारी करून म्हटले आहे की, ‘प्रचलित कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती पाहता, राज्य सरकारने मणिपूरच्या इम्फाळ पश्चिमेतील मोबाईल इंटरनेट सेवांवर बंदी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे’.
इम्फाळ पूर्व, थौबल, बिष्णुपूर आणि ककचिंग जिल्ह्यांच्या प्रादेशिक अधिकारक्षेत्रात VSAT आणि VPN सेवांसह इंटरनेट आणि मोबाईल डेटा सेवा पुढील 5 दिवसांसाठी निलंबित ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच जनतेच्या सोयीसाठी, इम्फाळ पश्चिम, इम्फाळ पूर्व, बिष्णुपूर आणि थौबल जिल्ह्यांतील सर्व भागात औषधे आणि खाद्यपदार्थांसह जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी प्रशासनाकडून सकाळी 5 ते दुपारी 12 वाजेपर्यंत संचारबंदीमध्ये शिथिलता आणली आहे.
कर्फ्यू शिथिलता कालावधी संपल्याने लोकांना आपापल्या ठिकाणी परतावे लागणार आहे. असे जरी असले तरी अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या लोकांना या संचारबंदीतून सूट देण्यात आली आहे.