सरत्या पावसाने माथेरानला झोडपलं!
माथेरान/संतोष पेरणे : माथेरान या लोकप्रिय पर्यटनस्थळी सध्या पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. दिवाळी सुट्टीच्या पार्श्वभूमीवर अनेक पर्यटकांनी सुट्टीचा आनंद घेण्यासाठी माथेरानची वाट धरली आहे. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या सरत्या पावसाने या पर्यटकांच्या उत्साहावर पाणी फेरले आहे. दिवसभर अधूनमधून सुरू असलेल्या पावसामुळे पर्यटकांची चांगलीच तारांबळ उडालेली दिसून आली.
माथेरान हे थंड हवेचे ठिकाण असून, येथील गुलाबी थंडीचा आनंद घेण्यासाठी पर्यटक हिवाळ्यात मोठ्या संख्येने येथे येतात. दिवाळीनंतरच माथेरानमधील हिवाळी पर्यटन हंगामाला सुरुवात होते. त्यामुळे येथील हॉटेल व्यवसायिक गणेशोत्सव, दसरा आणि दिवाळी या सणांची आतुरतेने वाट पाहत असतात. दरवर्षी दिवाळीनंतरचा पर्यटन हंगाम लक्ष्मीपूजनानंतर सुरू होतो आणि किमान १५ दिवस पर्यटकांची तुफान गर्दी या भागात पाहायला मिळते.
यावर्षीही गुजरातसह इतर राज्यांतील पर्यटक मोठ्या संख्येने माथेरानमध्ये दाखल झाले आहेत. शहरात रंगीबेरंगी रोषणाई, रात्री उशिरापर्यंत सुरू असलेली रेलचेल आणि पर्यटन व्यवसायात आलेली चैतन्याची लहर यामुळे माथेरान पुन्हा एकदा सजून निघाले आहे. मात्र यंदा पावसाळा लांबल्याने आणि सरता पाऊस अद्याप सुरू असल्याने पर्यटन हंगामावर त्याचा परिणाम स्पष्ट दिसत आहे.
दिवाळी आणि विकेंडच्या सुट्ट्यांमुळे माथेरानमध्ये गर्दीचा शिखरबिंदू गाठला असला, तरी मुसळधार पावसाने पर्यटकांना हॉटेलमध्येच थांबवून ठेवले आहे. अखंड सुरू असलेल्या पावसामुळे अनेक पर्यटकांना फिरायला अडचणी येत आहेत. काही पर्यटक प्लास्टिक रेनकोट घालून पावसाचा आनंद घेताना दिसत असले, तरी थंड वातावरण आणि ओलसर हवा यामुळे सर्दी, ताप किंवा आजारपणाची भीती निर्माण झाली आहे.
सध्याचा हा सरता पाऊस माथेरानच्या सौंदर्यात भर घालत असला, तरी पर्यटन व्यवसायासाठी मात्र अडथळा ठरत आहे. येथील स्थानिक व्यावसायिक आणि हॉटेल मालकांनी हवामान लवकर स्थिर व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.






