संग्रहित फोटो
पुणे/ अक्षय फाटक : पुणे शहरात विधानसभा निवडणूकांची धामधुम सुरू असतानाच आजींचे ३ बोकड अन् १ शेळी चोरीला गेल्याची घटना समोर आली असून, या घटनेने पुण्यात चांगलीच खमंग चर्चा रंगली आहे. आजींनी बोकड अन् शेळी न मिळाल्याने हडपसर पोलिसांकडे धाव घेतली आहे. बोकड व शेळी चोरीची तक्रार देखील दिली आहे. आता पोलिसांनी घटनेच्या ७ दिवसानंतर या प्रकरणात बोकड व शेळी चोरीप्रकरणी गुन्हा नोंदवत शोध सुरू केला आहे.
याप्रकरणी ६२ वर्षीय ज्येष्ठ महिलेने हडपसर पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्यानूसार, अज्ञातांवर चोरीचा गुन्हा नोंदवला आहे.
पुण्यातील चोरटे स्मार्ट तर आहेतच पण दिवसेंदिवस हे चोरटे काय-काय चोरून नेतील याचाही भरोसा राहिलेला आहे. कधी ड्रायफूट तर कधी बर्फी-पेढा आणि ब्रँडेड कपडे देखील चोरून नेले जात असल्याच्या घटना यापुर्वी घडल्या आहेत. पण, ऐन निवडणूकीत बोकड व शेळी चोरीला गेल्याने या घटनेची शहरभर खमंग चर्चा सुरू झाली आहे.
हडपसरमधील गोंधळेनगर परिसरात या आजी राहण्यास आहेत. त्यांच्या घराच्या परिसरात कॅनोलचा परिसर आहे. या कॅनोललगत त्यांनी त्यांचे तीन बोकड आणि १ शेळी १२ नोव्हेंबर रोजी नेहमीप्रमाणे दोरीने बांधून ठेवले होते. मात्र, दुसऱ्या दिवशी त्या सकाळी बोकड व शेळी सोडण्यास गेल्या असता त्यांना तेथे नसल्याचे दिसून आले. त्यांनी शोधाशोध केली. पण ते मिळाले नाही. नंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. आता याप्रकरणात पोलिसांनी सात दिवसांनी गुन्हा नोंद केला आहे.
हे सुद्धा वाचा : जेलमधून बाहेर आला अन् कोयत्याने तिघांना तोडला; पुण्यात नेमकं काय घडलं?
पुण्यात नागरिकांना लुटले
पुणे शहरात एकट्या पादचारी नागरिकांना भावनिक करून त्यांना लुटण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. पुन्हा दोन घटना घडल्या असून, एका ज्येष्ठ महिलेसह दोघांजवळील किंमती ऐवज चोरट्यांनी लांबविला आहे. सिंहगड रस्ता आणि कोंढवा भागात या घटना घडल्या आहेत. याप्रकरणी पर्वती पोलीस ठाण्यात ६२ वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे. त्यानूसार, अनोळखी चोरट्यांवर गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदार या गणेशमळा परिसरात राहायला आहेत. शनिवारी दुपारी एकच्या सुमारास सिंहगड रस्त्यावरील नवशा मारुती मंदिर परिसरातून त्या जात होत्या. त्यावेळी दोन चोरटे त्यांच्याजवळ आले. महिलांना मोफत साडी आणि पैशांचे वाटप करण्यात येत असल्याची बतावणी केली. तुमच्याकडील दागिने आणि रोकड काढून पिशवीत ठेवा, असे सांगितले. नंतर चोरट्यांनी महिलेला बोलण्यात गुंतवत त्यांचे लक्ष नसल्याची संधी साधून पिशवीतील दागिने आणि रोकड असा ५५ हजार ३०० रुपयांचा ऐवज चोरुन नेला. पोलीस उपनिरीक्षक पवार तपास करत आहेत.