संग्रहित फोटो
पुणे/अक्षय फाटक : पुणे शहरातील अवैध धंद्याबाबत तंबी देऊन अन् ६५ जणांची उचलबांगडी केल्यानंतर देखील त्यांची जागा आता नव्या वसूलीदारांनी घेतली आहे. परिणामी अवैध धंदे पुन्हा सुरू झाल्याचे दिसत असून, कात्रजमधील एका हुक्का पार्लरबाबतचा स्मरणपत्राचा एक मॅसेज सध्या पोलीस दलात प्रचंड व्हायरल होत आहे. स्मरणपत्राच्या मॅसेजमध्ये ६ वेळा हुक्का पार्लरबाबत तक्रार करूनही तो सुरूच आहे, असा आरोप केला जात आहे.
दरम्यान, सूत्रांच्या माहितीनुसार, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आठवड्याभरापुर्वीच येथे कारवाई केली होती. तरीही तो हुक्का पार्लर सुरू असल्याचे सांगितले जाते. तत्पुर्वी नुकताच कात्रजमधील तीन पत्ती जुगारावर छापा मारून भारती विद्यापीठ पोलिसांनी १७ जणांवर गुन्हा नोंदवला आहे. त्यामुळे शहरातील अवैध धंदे छुप्या पद्धतीने सुरूच असल्याचे दिसते.
मिळालेल्या माहितीनुसार, कात्रज तलावाजवळील एका वॉशिंग सेंटरमध्ये बेकायदेशीर हुक्का पार्लर चालविला जात आहे. त्याबाबत एका कॉमन मॅनने याबाबत कंट्रोल, स्थानिक पोलीस आणि पोलीस आयुक्तांना याची माहिती दिली होती. तसे स्मरणपत्रात तारखेनुसार माहिती दिली आहे. त्यानंतर सहाय्यक आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांवर त्यावर कारवाई देखील केली. परंतु, पुन्हा तो हुक्का पार्लर सुरू आहे, असा मॅसेज व्हायरल झाला आहे. पोलीस आयुक्त कार्यालयाकडून भारती विद्यापीठ पोलिसांना ‘मेसेज’ दिला आहे, असे उत्तर मिळाले मात्र, पुढे काहीच झालेले नाही, असा आरोप देखील यात केला आहे. दरम्यान, या हुक्का पार्लरबाबत पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती कळविल्यानंतर त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न झाल्याचेही म्हंटले आहे.
कात्रज तलावाजवळील हुक्का पार्लरवर यापूर्वी कारवाई केलेली आहे. संबंधित तक्रारदाराकडून करण्यात येणाऱ्या तक्रारीत तथ्य नसल्याचे दिसून येते. तसेच, त्यांच्या तक्रारीबाबतही शंका उपस्थित होते.
– दशरथ पाटील (वरिष्ठ निरीक्षक, भारती विद्यापीठ पोलीस ठाणे)
कात्रजमधील जुगार अड्ड्यावर छापा
आंबेगाव पोलिसांनी कात्रज परिसरात एका जुगार अड्ड्यावर छापा टाकला. पोलिसांनी याप्रकरणी जुगार अड्ड्याच्या चालकासह १६ जणांवर गुन्हा दाखल केला. त्यांच्याकडून मोबाइल, जुगार खेळण्याचे साहित्य, रोकड असा १ लाख १६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. जुगार अड्ड्याचा चालक किशोर सातपुते (रा. दांडेकर पूल), साहिल इब्राहिम साठी (रा. धनकवडी), किरण डिंबळे, रोहिदास गोरड (दोघे रा. पर्वती) यांच्यावर गुन्हा दाखल आहे. या प्रकरणी पोलीस अंमलदार बालाजी पांचाळ यांनी आंबेगाव पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ निरीक्षक शरद झिने यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मोहन कळमकर तपास करत आहेत.