वजन कमी करण्यासाठी गरम पाण्यात मध मिक्स करून पित असाल तर शरीराचे होईल गंभीर नुकसान
लठ्ठपणा, वजन वाढणे, मधुमेह, उच्च कोलेस्ट्रॉल, उच्च रक्तदाब इत्यादी आजारांच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली आहे. वजन वाढल्यानंतर शरीरात अनेक बदल दिसून येतात. या बदलांकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे. शरीरावर वाढलेल्या अनावश्यक चरबीमुळे अनेक गंभीर आजारांची लागण होते, ज्याचे आरोग्यावर वाईट दुष्परिणाम होतात. वजन वाढल्यानंतर ते कमी करण्यासाठी आहारात वेगवेगळ्या पेयांचे, महागड्या डाएटचा समावेश केला जातो. पण चुकीचा डाएट फॉलो केल्यामुळे वजन कमी होण्याऐवजी आणखीनच वाढू लागते. वजन कमी करताना वेगवेगळ्या पेयांचे सेवन केले जाते. त्यातील आवर्जून प्यायले जाणारे पेय म्हणून कोमट पाण्यात मध मिक्स करून पिणे. कोमट पाणी शरीरासाठी अमृतासमान आहे. कोमट पाण्याचे उपाशी पोटी नियमित सेवन केल्यास शरीर आणि आतड्यांमध्ये साचून राहिलेली घाण बाहेर पडून जाते. पण चुकीच्या पद्धतीने मध आणि कोमट पाण्याचे सेवन केल्यास शरीरावर गंभीर परिणाम दिसून येतील.(फोटो सौजन्य – istock)
नैसर्गिक गोडवा असलेले मध शरीरासाठी अतिशय प्रभावी ठरते. यामध्ये फ्लेवोनाईड्स, ऑर्गेनिक ॲसिड असे अनेक ॲण्टीऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. त्यामुळे नियमित मध खाल्ल्यास शरीरात वाढलेला मधुमेह आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहण्यास मदत होते. पण अनेक लोक चुकीच्या पद्धतीने मधाचे सेवन करतात. चुकीच्या पद्धतीने मधाचे सेवन केल्यास शरीरावर अनेक दुष्परिणाम दिसून येतात. यामुळे शरीराला फायदे होण्याऐवजी तोटे होतात. चला तर जाणून घेऊया मध खाण्याची योग्य पद्धत.
मध खाल्ल्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. पण कोमट पाण्यात मधाचे सेवन करून प्यायल्यामुळे शरीरावर गंभीर परिणाम दिसून येतात. यामुळे मधात असलेले पोषक घटक कमी होऊन जातात. यामध्ये असलेले ॲण्टीऑक्सिडंट्स, एन्झाईम्स आणि बायोॲक्टीव्ह कंपाउंड नष्ट होऊन जातात. याशिवाय रिॲक्शन होण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे गरम पाण्यासोबतच कोणत्याही गरम पदार्थांसोबत मध अजिबात खाऊ नये. वजन कमी करताना कोमट पाणी मधाचे सेवन केल्यानंतर शरीरावर कोणतीही रिअक्शन होत असेल तर मध गरम पाण्यात टाकून अजिबात पिऊ नये. त्यामुळे सॅलड, योगर्ट, फळं, स्मूदी इत्यादी थंड पदार्थांवर मध टाकून प्यावे.
मधाचे सेवन केल्यामुळे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम:
मधात साखर आणि कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण जास्त असल्याने अतिरिक्त सेवन केल्यास वजन झपाट्याने वाढू शकते. जास्त प्रमाणात मध खाल्ल्याने बद्धकोष्ठता, पोटात दुखणे किंवा जुलाब होऊ शकतात आणि पचनक्रिया मंदावू शकते.
शुद्ध मध ओळखण्याच्या पद्धती:
एका ग्लास पाण्यात मधाची एक धार सोडा. जर मध तळाशी जमा झाला तर तो शुद्ध आहे. जर तो पाण्यात मिसळला, तर तो भेसळयुक्त आहे.
कोणत्या वेळी मध खाऊ नये?
मध खाल्यानंतर गरम पाणी पिऊ नये: किंवा जेवणाच्या शेवटी गोड पदार्थ खाऊ नये. आयुर्वेदानुसार मध आणि काही इतर पदार्थांचे एकत्र सेवन करणे हानिकारक ठरू शकते.