पळवून आणलेल्या तीन वर्षांच्या बालकाला आई-वडिलांकडं केलं सुखरूपपणे सुपूर्द
पंढरपूर : लातूरमधून पळवून आणलेल्या एका बालकाला आरोपीने पंढरपुरात सोडून पलायन केले होते. हे बालक पंढरपुरात फिरताना आढळताच येथील समाजसेवक गणेश अंकुशराव यांनी त्याच्याकडून जाऊन आस्थेने विचारपूस केली. नंतर आवश्यक माहिती घेतल्यानंतर त्याला त्याच्या पालकांकडे सुपूर्द केले. त्यांनी केलेल्या कृतीचं सर्वत्र कौतुक होत आहे.
भुवैकुंठ पंढरपूर नगरीत माणुसकीचा जिवंत झरा मनात असणारी काही माणसं आहेत, यापैकीच एक म्हणजे येथील समाजसेवक गणेश अंकुशराव. गणेश अंकुशराव यांनी पंढरपुरातील अनेक अनाथ, निराधार, वंचितांवर ओढवलेल्या विविध प्रकारच्या संकटातून सोडवल्याचे अनेक किस्से आहेत. याचबरोबर हरवलेल्या अनेक लहान मुलांनाही त्यांच्या आई-वडिलांकडं सुखरूपपणे पोहोचवण्याचं पुण्यकर्मही त्यांनी अनेकदा केलंय.
नुकतंच एका आरोपीने पळवून आणलेल्या अवघ्या तीन वर्ष तीन महिन्यांच्या बालकाला सुरक्षितरित्या त्यांच्या पालकांकडं सुपूर्द करण्यामध्ये महत्वाची भूमिका पार पाडली आहे. 26 मे 2025 रोजी स्वरूप भीमाशंकर स्वामी हा मुलगा हनुमान मंदिर गुमास्ता कॉलनी, कव्हा रोड, लातूर येथून सकाळी अकराच्या सुमारास हरवला होता. त्या लहान मुलाच्या आई-वडिलांनी नजीकच्या पोलिस ठाण्यात हरविल्याची तक्रार केलेली केलेली होती.
लातूर पोलिसांकडून स्वरुप स्वामी हा लहान असल्यामुळे कोणीतरी अज्ञात व्यक्तीने फूस लाऊन पळवून नेलेले असल्याची लातूर पोलिसांना खात्री पटली. लातूर पोलिसांनी या मुलाच्या शोध घेण्यासाठी अनेक पथके तयार करण्यात आलेले होते. या लहान मुलाचा पोलीस प्रशासन ही शोध घेत होते. हा मुलगा पंढरपूर येथील चंद्रभागेच्या काठावरील आद्य क्रांतीकारक राघोजी भांगरे चौकात आदिवासी कोळी समाजाचे नेते गणेश यांना एकटाच फिरत असल्याचे लक्षात आले.
भीमा नदीचे पात्र हे संपूर्ण पाण्यानें भरलेले असल्यामुळे तो मुलगा चंद्र भागेच्या पाण्याच्या पात्रात जाईल म्हणून त्या मुलाला उचलून बाजूला आणून विचारपूस केली. त्या लहानशा चिमुकल्याला स्वत:चे नाव सांगता येत नव्हते. गणेश अंकुशराव यांनी सदर मुलास घेऊन सर्वत्र त्या मुलाचा पालकाचा शोध घेतला. गणेश अंकुशराव यांनी ताबडतोब पंढरपूर शहर पोलीस ठाण्याशी संपर्क साधून मुलाची माहिती फोटो आणि व्हिडिओ माध्यमातून दिली. नंतर हा मुलगा हा लातूर येथून हरवल्याची तक्रार दाखल असल्याची पंढरपूर शहर पोलिसांकडून सांगण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी योग्य कार्यवाही करत हरवलेल्या मुलाला पालकांच्या स्वाधीन केले.