सौजन्य - नवराष्ट्र टीम
पुणे : अनाथांची माई अर्थात ‘’सिंधुताई सपकाळ’’ यांच्या आश्रमातील मुलींशी लग्न करायचं आहे का ? असे विचारत आणि योग्य मुली दाखवतो, अशी बतावणी करत काही भामट्यांनी इंस्टाग्रामच्या माध्यमातून पाच ते सहा जणांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यात प्रत्येकी १५ ते २० हजार रुपये उकळले गेले असून, याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास सुरू केला अशी माहिती पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदिपसिंह गिल्ल यांनी दिली.
याप्रकरणी पद्मश्री ममता सिंधुताई सपकाळ यांनी सासवड पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून, भारतीय न्याय संहिता कलम ३१९, ३१८, ४६६(२) आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या तक्रारीनुसार, अज्ञात आरोपींनी इंस्टाग्रामवर फसवे पेज तयार केले. तेथे ‘आमच्या आश्रमातील तरुणींसाठी सुयोग्य वर शोधत आहोत’ असा प्रचार केला. इच्छुक व्यक्तींनी मॅसेज केल्यानंतर त्यांना मुली दाखवतो, भेट घालतो, तुमची कागदपत्रं तपासतो, असा बहाणा केला. त्यांच्याकडून प्रत्येकी १५ ते २० हजार रुपये ‘गेट पास’, ‘प्रोफाइल व्हेरिफिकेशन’ इत्यादी कारणे सांगून उकळले.
सिंधुताई सपकाळ यांचा फक्त एकच अधिकृत आश्रम आहे, हे असतानाही आरोपींनी सहा वेगवेगळ्या जिल्ह्यांत आश्रम असल्याचे सांगत फसवणूक केली. हे सर्व व्यवहार इंस्टाग्राम पेजद्वारे आणि ऑनलाइन पेमेंट पद्धतीने सुरू होते. संपूर्ण प्रकार सिंधुताईंच्या अधिकृत आश्रम व्यवस्थापनाच्या लक्षात आल्यावर, त्यांनी तातडीने सासवड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.
पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा नोंद करून सखोल तपास सुरू केला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून कोणकोणाशी संपर्क साधला गेला, किती लोकांची फसवणूक झाली, याचा तपास केला जात आहे. सामाजिक क्षेत्रात अमूल्य योगदान देणाऱ्या सिंधुताईंच्या नावाचा वापर करून लोकांची फसवणूक केल्याने या प्रकरणाने गंभीर स्वरूप धारण केले आहे. अधिक तपास सासवड पोलीस करत आहेत.
हे सुद्धा वाचा : पुण्यातील ‘या’ भागात चोरट्यांनी घरे फोडली; तब्बल लाखो रुपयांचा ऐवज चोरला