संग्रहित फोटो
पुणे : चोरट्यांनी बंद फ्लॅट हेरून विश्रामबाग तसेच वाघोलीत भागात घरे फोडली आहेत. या दोन घरफोड्यात तब्बल ८ लाखांचा ऐवज लांबविला असून, पहिली घटना भरदुपारी घडली आहे. तर दुसरी घटना सोमवारी उघडकीस आली आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान, या चोरट्यांचा मात्र, थांगपत्ता पोलिसांना लागलेला नसून, त्याबाबत पोलीस तपास करत आहेत.
विश्रामबाग पोलीस ठाण्यात संतोष जीवनगिकर (वय ५०) यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यानूसार, अज्ञाताविरूद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार लोकमान्यनगर जॉगिंग पार्क येथील एका इमारतीत राहतात. दरम्यान, सोमवारी दुपारी ते घराला कुलूप लावून गेले होते. यादरम्यान, चोरट्यांनी कुलूप तोडून आत प्रवेश केला. तसेच, बेडरूममधील कपाटातून सोन्या-चांदीचे दागिने व रोख असा २ लाख २२ हजारांचा ऐवज चोरून पोबारा केला. पुढील तपास उपनिरीक्षक नरवडे हे करत आहेत.
दुसरी घटना केसनंद भागात घडली असून, तळेरानवाडी रोडवरील एक इमारतीतील बंद फ्लॅट फोडून ५ लाख ७५ हजार २२१ रुपयांचा ऐवज चोरून नेल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी वाघोली पोलिसांत सचिन पेंधे (वय ३०, रा. केसनंद) यांनी तक्रार दिली आहे. तक्रारदार हे ३१ मे रोजी घराला कुलूप लावून गेले होते. तेव्हा चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप उचकटून घरफोडी केली. त्यांच्या घरातून सोने व चांदीचे दागिने आणि रोकड चोरून नेली. सोमवारी हा प्रकार उघडकीस आला आहे. अधिक तपास वाघोली पोलीस करत आहेत.
हे सुद्धा वाचा : गुंड गजा मारणेला मदत करणं भोवलं; ‘त्या’ साथीदाराच्या अडचणी वाढल्या