धक्कादायक ! 21 वर्षीय विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या; 14 महिन्यांपू्र्वीच झाला होता विवाह (सौजन्य : iStock)
बीड : गेवराई तालुक्यातील एरंडगाव येथील 28 वर्षीय विवाहित महिलेचा मृतदेह एका विहिरीत आढळून आला. तिच्या अंगावर मारहाणीच्या खूना असून सासरच्या लोकांनी तिला मारून विहिरीत टाकले, असा आरोप माहेरच्या लोकांकडून करण्यात येत आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करून जोपर्यंत आरोपींना अटक केली जात नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिकाच नातेवाईकांनी घेतली आहे.
संतप्त नातेवाईकांनी पोलिस अधिक्षक कार्यालयातही धाव घेतली होती. दरम्यान पोलिस प्रशासनाने कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर दुपारी उशिरा शवविच्छेदन करण्यात आले. एरंडगाव येथील विवाहिता वर्षा ओमप्रकाश लाटे ही महिला मंगळवारी सकाळी दहा वाजल्यापासून बेपत्ता होती. सकाळी ती शेतामध्ये अन्य एका महिलेसोबत काम करण्यासाठी आली. मात्र, त्या महिलेला मी घरी जात आहे, असे सांगून निघून गेली. दुपारनंतर वर्षा शेतात आणि घरी नसल्याने तिचा शोध सुरू घेण्यात आला. मात्र, ती मिळून येत नव्हती.
सायंकाळी चार ते पाच वाजल्याच्या दरम्यान लाटे यांच्या शेतातील विहिरीजवळ वर्षा हिचा स्कार्फ दिसून आला. त्यामुळे ती विहिरीत असावी म्हणून विहिरी शोध घेण्यास सुरुवात केली. तेव्हा तिचा मृतदेह विहिरीत आढळला. तोपर्यंत तिचे माहेर असलेल्या ईटकुर येथील नातेवाईक घटनास्थळावर आले.
सासरच्यांवर गुन्हा करा
जोपर्यंत पोलिस घटनास्थळी येत नाहीत, तोपर्यंत मृतदेह काढला जाणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली. शेवटी गेवराई पोलिस त्या ठिकाणी दाखल झाले. पोलिसांच्या उपस्थितीत रात्री वर्षाचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला व शवविच्छेदनासाठी गेवराईच्या ग्रामीण रुग्णालयाने पाठवण्यात आला. तिच्या अंगावर मारहाणीच्या खुणा आढळून आल्या. गळ्यावर, पायावर, यासह अन्य काही भागांवर मारहाणीच्या खुणा होत्या. आमच्या मुलीचा खून करून तिच्या मृतदेह सासरच्या लोकांनी विहिरीत टाकला, असा आरोप वर्षाच्या माहेरच्या लोकांनी केला.