नाला ओलांडताना मुख्याध्यापकाचा मृत्यू; दुसऱ्या दिवशी आढळला मृतदेह (संग्रहित फोटो)
तुमसर : कंपनीच्या मालकीची दुचाकी परत करून येतो, असे पत्नीला सांगून गेलेल्या खाण सुपरवाझर असलेल्या एकाने आत्महत्या केली. नागपूरहून निघालेल्या खाण सुपरवायजरने कंपनी व्यवस्थापनाच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे रेकॉर्डिंग थेट फॅमिली व्हॉट्सअॅप ग्रुपवर टाकले. त्यानंतर स्वतःला जाळून घेतल्याची खळबळजनक घटना आंधळगाव पोलिस हद्दीतील डोंगरगाव येथील पार्श मिनरल्स खदान परिसरात घडली.
खाण सुपरवायजरने आत्महत्या केल्याची ही घटना गुरुवारी (दि. 8) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास उघडकीस येताच आंधळगाव पोलिसांसह स्थानिकांनी कंपनीच्या दिशेने धाव घेतली. पोलादी कंटेनरमध्ये थाटलेल्या कार्यालयात घडलेली ही घटना सुरुवातीला शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा कयास होता.
जावेद जमील शेख (वय 49, ह.मू. तिलक वॉर्ड मोहाडी/मूळचे रा. चंद्रपूर) याचे रेकॉर्डिंग पुढे येताच घटनेने गंभीर वळण घेतले. पतीला वारंवार कॉल करूनही फोन बंद येत असल्याने फिर्यादी पत्नी नाजिया जावेद शेख (40, रा. मोहाडी) हिने परिचितांना संपर्क केला असता ही घटना उघडकीस आली. कंटेनर आतून बंद करून घेत पेटवून घेतल्याने जावेद 90 टक्के जळाला. त्याची ओळख देखील पटणार नाही, अशा स्थितीत पोलिसांनी त्याला उत्तरीय तपासणीकरिता तुमसर उपजिल्हा रुग्णालयात रवाना केले होते.
आरोपी मालकांची टोळी भूमिगत
मृताच्या रेकॉर्डिंगबाबत कळताच आरोपी भूमिगत झाले आहेत. सध्या पोलिसांना ते सापडत नाही. मात्र, तुमसर शासकीय रुग्णालयात आरोपींकडून मध्यस्थी साधण्याच्या हेतूने काही पसार इसमांनी पीडित कुटुंबीयांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीने सांगितले.
मानसिक त्रास देणे, सर्वांसमक्ष प्रताडीत करणे, असा प्रकार सुरू होता. 2031 पर्यंत कंपनीचे काम चालले, या आधारावर करार करण्यात आला होता. दरम्यान, बंद पडलेल्या कंपनीत अवेळी कर्तव्य बजावण्यासाठी दबाव टाकत असल्याचा स्पष्ट उल्लेख आहे.
पोलिसांच्या चौकशीवर नजरा
जिल्हा न्यायालयाने अनेक गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यात मोहाडी पोलिसांना चौकशीच्या संदर्भात चांगलेच फटकरल्याचा रेकॉर्ड असलेल्या पोलिसांकडून जावेदच्या प्रकरणांत सगळे बारकावे हाताळून पीडित कुटुंबीयांना न्याय मिळवून देतील, अशी अपेक्षा स्थानिकांनी व्यक्त केली आहे. त्यात सदर चौकशीवर उपनगरातील विशिष्ट समुदायाच्या शिष्टमंडळाच्या नजरा लागून आहेत.
पत्नीने मागितला न्याय
2 मे पासून मृत व त्याचे कुटुंब नागपूर येथे नातेवाईकांकडे गेले होते. जावेद शेख नागपूर येथून कंपनीच्या दुचाकीने कर्तव्याच्या ठिकाणी नियमित हजर राहत होता. घटनेच्या दिवशी देखील तो नागपूरहून कंपनीत पोहोचला होता. आरोपी वीरेंद्र त्याला वारंवार फोनवरून धमकावत होता. तसा उल्लेख फिर्यादी नाजियाने आपल्या तक्रारीत केला आहे. नाजियाने आपल्या पतीची आत्महत्या नसून कंपनीने त्यांचा जीव घेतल्याची भावना व्यक्त करत आरोपींना कठोर शिक्षेची मागणी केली आहे.