शाळकरी मुलाच्या खुनाचा प्रयत्न (फोटो- istockphoto)
पुणे: नात्यातील मुलीबाबत अपशब्द वापरल्याने अल्पवयीनांनी शाळकरी मुलाच्या डोक्यात दगड मारून त्याच्या खूनाच्या प्रयत्न केल्याचा प्रकार कोंढवा भागात घडला. याप्रकरणी तीन अल्पवयीन मुलांवर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात १५ वर्षीय मुलाच्या ४२ वर्षीय वडिलांनी तक्रार दिली आहे. त्यानूसार, तीन मुलांवर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, १५ वर्षीय मुलगा कोंढव्यातील टिळेकरनगर भागात राहायला आहे. मुलाने शाळेतील एका मुलीबाबत अपशब्द वापरले होते. त्यामुळे अल्पवयीन मुले चिडली होती. बुधवारी सकाळी आठच्या सुमारास तो शाळेत निघाल होता. तेव्हा टिळेकरनगर परिसरातील आकृती सोसायटीजवळ तीन अल्पवयीनांनी मुलाला अडवले. त्याला शिवीगाळ करुन मारहाण केली. एकाने शाळकरी मुलाच्या डोक्यात दगड मारल्याने त्याला गंभीर दुखापत झाली. मारहाण करुन अल्पवयीन पसार झाले. गंभीर जखमी झालेल्या मुलाला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून, पोलीस उपनिरीक्षक पूजा पाटील तपास करत आहेत. गेली काही दिवसांमध्ये पुण्यात गुन्हेगारी वाढल्याचे पाहायला मिळत आहे. तर पुणे पोलीस देखील गुन्हेगारी कमी करण्यासाठी अनेक उपाययोजना करताना दिसून येत आहेत.
शाळकरी मुलांकडून गंभीर गुन्हे
पुण्यातील गुन्हेगारीत अल्पवयीन मुलांचा सहभाग चिंताजनक असतानाच आता शाळकरी मुलांकडून देखील गंभीर गुन्हे घडू लागले आहेत. पंधरा दिवसातील शाळकरी मुलांच्या गंभीर मारहाणीची ही दुसरी घटना घडली आहे. तसेच, किरकोळ वादातून ही मुले गंभीर गुन्हे करत असल्याचे दिसत आहे. गेल्या आठवड्यात हडपसर भागातील एका शाळेत वार्षिक समारंभातील वादातून वर्गमित्राचा काचेच्या तुकड्याने गळा चिरल्याची घटना घडली होती. या घटनेत मुलगा गंभीर जखमी झाला होता. तर, गेल्या वर्षी भवानी पेठेतील एका शाळेच्या आवारातच शाळकरी मुलावर तीक्ष्ण शस्त्राने वार केले होते.
महिलांचे मंगळसूत्र हिसकावले
कात्रज परिसरात दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी पादचारी महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून चोरून पोबारा केला आहे. तर, स्वारगेट परिसरात पीएमपी बसमध्ये चढत असताना महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरून पोबारा केल्याच्या घटना घडल्या आहेत. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात ३० वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे. त्यानूसार, दुचाकीवरील दोन अनोळखी चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा: पुण्यात चोरट्यांचा धुमाकूळ; ‘या’ भागातून महिलांचे मंगळसूत्र हिसकावले
दुसरी घटना स्वारगेट येथील पीएमपीएल बस स्टॉप येथे घडली आहे. थेरगाव येथील ४० वर्षीय महिला स्वारगेट भागात आलेली होती. त्या सायंकाळी पुन्हा थेरगाव येथे जाण्यासाठी पीएमपी बस स्टॉपला थांबलेल्या होत्या. तेव्हा बस आली असता त्या बसमध्ये चढत असताना चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील २५ हजारांचे मंगळसूत्र जबरद्सीने हिसकावून चोरून पोबारा केला. चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेऊन त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरून पोबारा केला. पुढील तपास पोलीस करत आहेत.