पीडित अल्पवयीन मुलगी ७ महिन्यांची गरोदर (फोटो सौजन्य-X)
अमरावती : राजस्थानमधील तरुणासोबत अल्पवयीन मुलीचा विवाह करणे एका कुटुंबाला महागात पडले आहे. प्रसूतीसाठी तिला रुग्णालयात दाखल केल्यानंतर हा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणात शुक्रवारी (दि. 21) ब्राम्हणवाडा थडी पोलिसांनी अल्पवयीन मुलीच्या आई-वडिलासह कुटुंबातील इतर 9 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
ब्राह्मणवाडा थडी पोलिस स्टेशन परिसरातील रहिवासी असणाऱ्या अल्पवयीन मुलीचा विवाह राजस्थानचा रहिवासी शाहरुख शाह या तरुणासोबत ठरवण्यात आला. मुलीच्या कुटुंबाने फेब्रुवारी 2023 मध्ये मुलीचे लग्न केले. लग्नानंतर मुलगी राजस्थानमध्ये तिच्या सासरी घरी गेली. दरम्यान, 30 एप्रिल 2024 रोजी ती गर्भवती राहिल्याने तिला तिच्या माहेरी पाठवण्यात आले. जिथे पालकांनी अल्पवयीन मुलीला प्रसूतीसाठी जिल्हा स्त्री रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी मुलीचे आधारकार्ड पाहिल्यानंतर ती अल्पवयीन असल्याचे समोर आले. रुग्णालय प्रशासनाने याची माहिती तत्काळ गाडगेनगर पोलिसांना दिली.
दरम्यान, पोलिसांनी रुग्णालयात पोहोचून अल्पवयीन मुलीचा जबाब नोंदवला. त्यानंतर पोलिसांनी पती आणि आई, आजी, आजोबा, सासू, सासरे यांच्यासह कुटुंबातील 9 जणांवर गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. ब्राह्मणवाडा थडी येथे बालविवाह झाल्याने गाडगेनगर पोलिसांनी हे प्रकरण ब्राह्मणवाडा थडी पोलिसांकडे सोपविले आहे. पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
गर्भवती मुलीचा गळा दाबून खून
दुसऱ्या एका घटनेत, काही दिवसांपूर्वीच एका पित्याने आपल्या 17 वर्षीय गर्भवती मुलीची गळा आवळून हत्या केली. यानंतर गुन्ह्याची कबुली देण्यासाठी पोलिस ठाणे गाठले आणि गुन्ह्याची कबुली दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला. यानंतर पोलिसांकडून याप्रकरणाचा तपास केला जात आहे.