विजय काते : मिरा रोड परिसरात प्रतिबंधित गुटखा, पान मसाला आणि सिगरेटची सर्रास विक्री सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. मिरा रोड रेल्वे स्टेशनच्या मागील बाजूस असलेल्या एसटी बसस्थानकाजवळील एका पानटपरीत मोठ्या प्रमाणात गुटखा व पान मसाल्याचा साठा आढळून आला.
या प्रकाराचा पर्दाफाश मिरा रोड येथील नीलीमा सोनवणे या धाडसी महिलेनं केला. त्यांनी थेट नया नगर पोलिस ठाण्यात धाव घेत विक्रेत्याविरोधात तक्रार नोंदवली. सुरुवातीला पोलिसांनी टाळाटाळ करून तक्रार नोंदवण्यास नकार दिला. मात्र, सोनवणे यांनी सातत्याने पाठपुरावा करत दबाव आणल्यानंतर अखेर पोलिसांना गुन्हा दाखल करावा लागला.
सरकारच्या स्पष्ट बंदी आदेशानंतरही गुटखा–पान मसाल्याची विक्री सुरू असल्याने स्थानिक प्रशासन आणि पोलिसांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. नागरिकांचा आरोप आहे की, पोलिस आणि अन्न व औषध प्रशासन विभागाने वेळेवर लक्ष दिले असते, तर असा मोठा साठा उघडकीस आला नसता.या कारवाईनंतर परिसरात खळबळ उडाली असून, नागरिक आणखी कठोर पावले उचलण्याची मागणी करत आहेत.
सततच्या वाढत्या गुन्हेगारीमुळे भयभीत झालेले नागरिक जीव मुठीत घेऊन राहत आहेत. काही दिवसांपूर्वीच मीरा-भाईंदर-वसई विरार गुन्हे शाखा (कक्ष-4) यांनी तेलंगणातील चेरापल्ली परिसरात एमडी (मेफेड्रॉन) हा अमली पदार्थ बनविणारा कारखाना उद्ध्वस्त करून मोठा गुन्हेगारी पर्दाफाश केला . या कारवाईत कारखाना मालक श्रीनिवास विजय वोलेटी व त्याचा साथीदार तानाजी पंढरीनाथ पटवारी यांना अटक करण्यात आली आहे. या ठिकाणाहून 5 किलो 790 ग्रॅम एमडी, 35,500 लिटर रसायन, 950किलो पावडर व इतर साहित्य जप्त करण्यात आले असून, आंतरराष्ट्रीय बाजारभावानुसार याची किंमत तब्बल 12हजार कोटी रुपये एवढी होते.
8ऑगस्ट रोजी काशिमीरा नाका येथे फातिमा मुराद शेख ऊर्फ मोल्ला (23) हिला एमडीसह पकडण्यात आले होते. ती बांग्लादेशी नागरिक असल्याचे समोर आले आहे. तिच्या चौकशीतून पुढील गुन्हेगारांचा शोध लागला. त्यानंतर पोलिसांनी मीरा रोड परिसरातून 10जणांना अटक केली. त्यांच्या ताब्यातून 178 ग्रॅम एमडी व 23.97 लाख रुपये रोख जप्त करण्यात आले. तपास पुढे नेताना एमडी तेलंगणातून येत असल्याचे उघड झालं होतं.
त्यातबरोबर अशीच दुसरी घटना शहरात घडली. अंमली पदार्थ विक्रीविरोधात राबवलेल्या विशेष मोहिमेत नवघर पोलीस ठाणे यांनी 251ग्रॅम वजनाचा एम.डी. मॅफेड्रॉन जप्त केला होता. याची किंमत सुमारे 1,255,000 इतकी होती. या प्रकरणात साहिल विजय सिंग या 20 वर्षीय तरुणाला मीरारोड येथून पोलीसांनी अटक केलीआली आहे. ही कारवाई दि.2 सप्टेंबर रोजी भाईंदर पूर्व येथील नवघर फाटक सबवे जवळ करण्यात आली.तपासणीदरम्यान आरोपीकडे डी. मॅफेड्रॉनचा मोठा साठा सापडला होता.