सदनिकेच्या बाहेर पादत्राणांच्या जाळीत (शू रॅक) चावी ठेवणे महागात
पुणे : सदनिकेच्या बाहेर पादत्राणांच्या जाळीत (शू रॅक) चावी ठेवणे महागात पडले. चावीचा वापर करुन चोरट्याने सदनिकेत प्रवेश करुन कपाटातील एक लाख ४१ हजार रुपयांचे दागिने चोरुन नेल्याची घटना नुकतीच लोणी काळभोरमध्ये घडली. या प्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.
याबाबत एका तरुणाने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुण लोणी काळभोरमधील कदमवाक वस्ती परिसरात असलेल्या साईरंग सोसायटीत राहायला आहे. कामानिमित्त बाहेर तरुण आणि त्याचे कुटुंबीय बाहेर जात असल्याने त्यांनी चावी सदनिकेच्या बाहेर असलेल्या पादत्राणांच्या जाळीत लपवून ठेवली होती. चोरट्याने पादत्राणाच्या जाळीत लपवून ठेवलेली चावी घेतली. त्यानंतर सदनिकेचे कुलूप चावीने उघडून प्रवेश केला. शयनगृहातील कपाटातून एक लाख ४१ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरुन नेल्याची घटना उघडकीस आल्यानंतर तरुणाने पोलिसांकडे तक्रार दिली.
दरम्यान, सदनिकेत चोरी करणारा चोरटा माहितगार असावा, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलीस कर्मचारी सागर जगदाळे तपास करत आहेत. सदनिकेच्या बाहेर पादत्राणाच्या जाळीत, कुंडीत, तसेच दरवाज्याच्या फटीत ठेवलेली चावी चोरून सदनिकेतून दागिने लांबविण्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत.
ब्युटी पार्लरमधील महिलेकडून अंगठी चोरी
दुसऱ्या एका घटनेत, ब्युटी पार्लरमध्ये काम करणाऱ्या महिलेने ग्राहक महिलेची 30 हजार रुपयांची अंगठी चोरुन नेल्याची घटना नांदेड सिटी भागात घडली. या प्रकरणी ब्युटी पार्लरमध्ये काम करणाऱ्या एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत ब्युटी पार्लर मालक महिलेने नांदेड सिटी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नांदेड सिटी परिसरात ब्युटी पार्लर आहे. ११ जून रोजी दुपारी ब्युटी पार्लरमध्ये एक महिला आली होती. महिलेने तेथील टेबलवर अंगठी ठेवली होती. महिलेचे लक्ष नसल्याची संधी साधून ब्युटी पार्लरमधील महिलेने सोन्याची अंगठी चोरली, असा आरोप फिर्यादीत करण्यात आला. त्यानंतर या प्रकरणी महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक सुरेश खरमाटे तपास करत आहेत.






