खंडणी न दिल्याने रचला हत्येचा डाव; पोलिसांनाच धक्काबुक्की, दोघे अटकेत
नागपूर : अमली पदार्थ विक्रीप्रकरणातील आरोपीकडे ५० हजारांची खंडणी मागण्यात आली. मात्र, ही खंडणी न दिल्याने त्याची हत्या करण्याच्या उद्देशाने चाकू घेऊन निघालेल्या दोघांचा कळमना पोलिसांनी डाव उधळून लावला. ईदच्या मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर वाजपेयीनगर परिसरात तैनात असलेल्या पोलिसांच्या गस्ती पथकाला संशय आल्याने दोघांना पकडले. मात्र, ताब्यात घेताना आरोपींनी पोलिसांशी झटापट करत शिवीगाळ व धक्काबुक्की केली.
याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. मोहम्मद आरीफ ऊर्फ बंगाली (वय २७, रा. हस्तिनापूर, कळमना) आणि टिमेश्वर मुकेश शाहू (वय २१, रा. गणेशनगर, कळमना) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरीफची सुमारे वर्षभरापूर्वी कारागृहात वंश यादव नावाच्या गुन्हेगाराशी ओळख झाली होती.
हात पकडून पोलिसासोबत गैरवर्तन
याचदरम्यान ईदच्या मिरवणुकीमुळे वाजपेयीनगर परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात केला होता. सहाय्यक पोलिस निरीक्षक अडीप जाधव, पोलिस हवालदार रवी शाहू, महेश लोयी यांच्यासह कर्मचारी परिसरात गस्त घालत होते. गस्तीवेळी आरीफ आणि टिमेश्वर आढळले. संशयास्पदरीत्या पोलिसांनी त्यांना थांबवून झडती घेण्याचा प्रयत्न केला असता दोघांनी विरोध करत पोलिसांशी झटापट सुरू केली. आरीफने एपीआय अडीप जाधव यांचा हात पकडून त्यांच्या करंगळीला मुरगळत इजा केली तसेच धक्काबुक्की केली.
कपिलनगर ठाण्यातही गुन्हा दाखल
टिमेश्वरनेही पोलिस कर्मचारी महेश लोयी यांच्याशी झटापट केली. दोघांनी पोलिसांना शिवीगाळ करत हातबुक्कीने मारहाण करण्याचा प्रयत्न केला. अखेर पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले. झडतीमध्ये आरीफजवळ चाकू सापडला. चौकशीत वंश यादवच्या हत्येच्या उद्देशाने दोघे निघाल्याचे समोर आले. दरम्यान, वंश यादवच्या तक्रारीवरून कपिलनगर पोलिस ठाण्यातही आरीफविरुद्ध खंडणी व जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरीफविरुद्ध यापूर्वी तीन डझनहून अधिक गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.






