फोटो सौजन्य- iStock
नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून फसवणुकीच्या घटना वाढत आहेत. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडूनही खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. त्यात कर्नाटकातील बंगळुरु येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या ठिकाणी फसवणुकीची घटना घडली. यातील विशेष बाब म्हणजे संबंधिताला ना OPT मिळाला, ना कोणताही फोन आला तरीही तब्बल 30 लाखांची फसवणूक झाली आहे.
बंगळुरूपासून सुमारे 76 किमी अंतरावर असलेले एक छोटेसे शहर आहे, त्याठिकाणी हा प्रकार झाला. 2020 मध्ये या शहरातून अशा काही घटना समोर आल्या, ज्यामुळे पोलिस अधिकाऱ्यांनाही आश्चर्य वाटले. देशात कोविड साथीमुळे लोक घरातच बंदिस्त असताना, अचानक येथे स्किमिंगच्या घटना घडू लागल्या होत्या. स्किमिंग ही एक पद्धत आहे ज्यामध्ये एटीएम मशीनमध्ये विशेष उपकरणे बसवून प्रथम लोकांच्या डेबिट कार्डची माहिती चोरली जाते आणि नंतर त्यांचे पैसे काढले जातात.
लॉकडाऊन उठवल्यानंतर कर्नाटकच्या तुमकुरुमधील 63 हून अधिक लोकांनी पोलिसांत तक्रारी दाखल केल्या आहेत. बँक खात्यांमधून त्यांच्या नकळत पैसे काढण्यात आले आहेत. पोलिसांनी तपास केला तेव्हा असे आढळून आले की, फक्त दोन दिवसांत वेगवेगळ्या खात्यांमधून सुमारे 30 लाख रुपये काढले गेले आहेत.
वेगवेगळ्या शहरांमधून काढली रक्कम
चौकशीदरम्यान, सर्व पीडितांनी सांगितले की त्यांनी OTP कोणाशीही शेअर केला नाही किंवा त्यांना कोणताही स्कॅम कॉल आला नाही. सुरुवातीच्या तपासादरम्यान, पोलिसांना असे आढळून आले की ही रक्कम बंगळुरू, दिल्ली, चेन्नई आणि देशातील काही इतर शहरांमधील एटीएममधून काढण्यात आली होती. या प्रकरणाच्या तपासासाठी एक टीम तयार करण्यात आली.
सीसीटीव्ही पाहिला अन् सुगावा लागला
पीडितांची चौकशी केल्यानंतर आणि एटीएममधील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर पोलिसांना एक सुगावा लागला. भीमसंद्रा परिसरातील एका एटीएममध्ये आफ्रिकन वंशाचा माणूस काही मिनिटांसाठी थांबला होता आणि 30 तासांनंतर तो पुन्हा त्याच एटीएममध्ये आल्याचे उघड झाले. काही सीसीटीव्ही फुटेजमध्ये असेही दिसून आले की तो माणूस एका कारमधून आला होता. नंतर अधिक तपास केला असता याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली.
डेबिट कार्डचा चोरायचा डेटा
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी की-पॅडच्या वर पिनहोल कॅमेरा आणि कार्ड स्वाईपच्या ठिकाणी स्किमिंग डिव्हाईस बसवले होते. ही उपकरणे डेबिट कार्डचा डेटा चोरतात. त्यावेळी वापरले जाणारे डेबिट कार्ड मॅग्नेटिक स्ट्राईप तंत्रज्ञानावर आधारित होते. नंतर, बँकांनी एटीएम कार्डमध्ये मॅग्नेटिक स्ट्राईप वापरणे बंद केले आणि स्किमिंग टाळण्यासाठी मायक्रोचिप तंत्रज्ञानाचा वापर केला.