वैजापूरमध्ये विवाहित पीडितेवर अत्याचार (Photo Credit - X)
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला तालुक्यातील भिवगाव येथील रहिवासी असून तिचे २०११ मध्ये लग्न झाले आहे. आरोपी हा पीडितेच्या चुलतमामाचा मुलगा आहे. नातेवाईकांच्या कार्यक्रमांनिमित्त त्याचे पीडितेच्या घरी येणे-जाणे वाढले होते. २०२० नंतर त्यांच्यात फोनवर संवादही सुरू झाला. त्यानंतर ते दोघे फोनवर एकमेकांशी बोलू लागले.
असा रचला अत्याचाराचा सापळा
एका दिवशी पीडित महिलेच्या घरी कोणी नसतांना ‘तो’ तिच्या घरी आला व म्हणाला की, ‘माझ्यासाठी लिंबू शरबत कर’ तिनेही दोन लिंबू शरबत करून आणले. या घाईगडबडीत त्याने तिला पिण्यासाठी पाणी मागितले होते. ती पाणी आणण्यास आत गेली असता त्याने तिच्या शरबतमध्ये गुंगीचे औषध टाकून दिले. पीडितेने ते शरबत पिताच ती बेशुद्ध झाली. यानंतर तिला काहीच समजले नाही. यावेळी त्याने तिचे आक्षेपार्ह छायाचित्रे काढली.
ब्लॅकमेलिंग आणि वारंवार अत्याचार
त्यानंतर चार दिवसांनी तो पुन्हा तिच्या घरी आला. त्याने काढलेले आक्षेपार्ह छायाचित्रे पीडितेला दाखवून म्हटला की, ‘हे फोटो मी तुझ्या पती, सासू व नातेवाईकांना दाखवितो’ मात्र यावर महिलेने त्याला ‘तुला काय पाहिजे?’ अशी विचारणा केली. तेव्हा त्याने ‘तू माझ्या सोबत बाहेर चल’ असे म्हणून तिला म्हैसमाळ येथील एका लॉजवर नेले व तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर वारंवार अशीच धमकी देऊन त्याने तिच्यावर वेगवेगळ्या लॉजवर नेऊन वेळोवेळी अत्याचार केला. यानंतर छायाचित्र नातेवाईकांना दाखविण्याची धमकी देत त्याने पीडितेकडून पैसे उकळण्यास सुरुवात केली.
सततच्या प्रकाराला कंटाळून पोलिसांत धाव
अखेर या सर्व प्रकाराला कंटाळून एके दिवशी महिलेने सर्व हकीकत तिच्या काकाला व अन्य नातेवाईकांना सांगितली. त्यांनीही त्याला समजविले. मात्र त्याच्या वागण्यात काही एक फरक पडला नाही. अखेर पीडितेने वैजापूर पोलिस ठाणे गाठत त्याच्याविरुद्ध तक्रार दिली. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात येऊन पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला एका दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.






