कर्जतमध्ये दोन गोवंश जनावरांची कत्तल, 3 आरोपीं विरुद्ध गुन्हा दाखल (फोटो सौजन्य-X)
कर्जत, रायगड : कर्जत तालुक्यातील दामत गावात गोवंशीय जनावराची कत्तल सुरु असताना नेरळ पोलिसांनी धाड टाकली. त्याचवेळी गोवंश मांस तसेच कत्तल करणारे तिघे यांना ताब्यात घेतले.या तिघांना नेरळ पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले असून त्यातील एक तरुण हा सराईत गुन्हेगार आहे.
नेरळ पोलीस ठाणे हद्दीतील मुस्लिम बहुल दामत गावात मोठ्या प्रमाणात गोवंश कत्तल होत असल्याच्या तक्रारी मागे अनेक वर्षे सुरु होत्या.मात्र मागील काही महिन्यात नेरळ पोलिसांच्या सतत होणाऱ्या कारवाया यामुळे दामत गावातील गोवंश जनावरे यांची कत्तल होण्याचे प्रमाण घटले आहे.मात्र तरीदेखील गोवंश जनावरे यांची कत्तल करण्याचे कोणतेही शासकीय परवाने नसताना देखील छुप्प्या पद्धतीने जनावरे यांची कत्तल सुरूच आहे. त्यामुळे अलर्ट मोड वर असलेल्या नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस यांना दामत गावात गोवंश कत्तल केली जात असल्याची माहिती मिळाली.त्यावेळी ड्युटीवर असलेलं नेरळ पोलिसांचे पथक रात्रीच्या वेळी दामत गावात पोहचले.
पोलीस नाईक अण्णासाहेब मेटकरी हे आपल्या स्टाफ सह दामत गावात पोहचले त्यावेळी फुरकान परवेझ नजे याच्या गोठ्यामध्ये दोन गोवंश जनावरे यांची कत्तल करून त्याचे मांस बाजूला करण्याचे आणि अन्य कामे सुरु होती. त्यावेळी त्या ठिकाणी साधारण १४० किलो मांस,वजन काटा,लाकडी खांडणी,लोखंडी सुरे आणि कानस आदी साहित्य आढळून आले.या प्रकरणी नेरळ पोलिसांच्या पथकाने दामत गावातील फुरकान परवेज नजे, वय-२०वर्षे,सलमान खुरशीद नजे, वय-२८ वर्षे,अखिल मुस्ताक नजे, वय-३४ वर्षे यांना ताब्यात घेऊन त्यांना अटक केली .
दामत गावातील गोवंश जनावरे यांच्या कत्तल प्रकरणी नेरळ पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर १६३/ २०२५ नुसार भारतीय न्याय संहिता २०२३कलम ३२५, ३(५) सह महाराष्ट्र प्राणी संरक्षण सुधारणा अधिनियम सन १९९५ चे कलम ५ (ब) चे उल्लंघन ९, ५ (क) चे उल्लंघन ९ (अ) नुसार गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याचा तपास नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक श्रीरंग किसवे करीत आहेत.या गुन्ह्यातील तिन्ही आरोपीना कर्जत दिवाणी न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
गोवंशाचे मांस ताब्यात ठेवल्यास, कलम सहाचे उल्लंघन केल्यास, दोन हजार रूपये दंड व एक वर्षे कारावास अशी शिक्षेची तरतूद आहे. उल्लंघन झाल्यास पोलीस उपनिरीक्षकापेक्षा कमी दर्जा नसलेल्या कोणत्याही पोलीस अधिकाऱ्यास कारवाई करण्याचा अधिकार कलम ८ नुसार प्रदान करण्यात आलेला आहे.