बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश; अमेरिकन नागरिकांना लुटणाऱ्या मोठ्या रॅकेटचा भांडाफोड, ७ जणांना अटक
विजय काते, भाईंदर: मिरा रोड येथे चालवले जात असलेल्या एका मोठ्या बोगस कॉल सेंटरवर पोलिसांनी छापा टाकून अमेरिकन नागरिकांना फसवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या छाप्यात सात जणांना अटक करण्यात आली असून, बेकायदेशीररित्या चालवले जाणारे हे कॉल सेंटर दररोज तब्बल १ ते १.५ कोटी रुपये कमवत असल्याचे उघड झाले आहे. ठाणे पोलिसांनी केलेल्या या कारवाईत कोट्यवधी रुपयांचे संगणकीय साहित्य, हार्ड डिस्क आणि अन्य महत्त्वाचे पुरावे जप्त करण्यात आले आहेत.
ठाणे पोलिसांच्या तपासानुसार हे कॉल सेंटर अमेरिकन नागरिकांना IRS (Internal Revenue Service) किंवा मोठ्या आर्थिक संस्थांचे अधिकारी असल्याचे भासवून त्यांना कर भरण्याच्या नावाखाली धमकावत होते. कॉलर अमेरिकन उच्चारात बोलून नागरिकांना सांगत की त्यांनी कर चुकवला असून, जर त्यांनी त्वरित तो भरला नाही तर पोलिस त्यांच्या घरी येऊन अटक करतील.या धमकीमुळे घाबरलेल्या बळींनी १०,००० डॉलरपर्यंत पैसे देण्याची तयारी दर्शवली. मात्र, आरोपी हे व्यवहार प्रीपेड गिफ्ट कार्ड्स, क्रिप्टोकरन्सी किंवा अन्य डिजिटल माध्यमातून करून घेत असत, जेणेकरून त्यांचा मागोवा घेता येऊ नये.हे बनावट कॉल सेंटर रॉयल कॉलेजजवळील सात मजली डेल्टा इमारतीतून चालवले जात होते. येथे तीन शिफ्टमध्ये शेकडो कर्मचारी कार्यरत होते, जे अमेरिकन उच्चारात बोलण्यासाठी विशेष प्रशिक्षण घेत होते.
Govind Pansare case: कॉम्रेड गोविंद पानसरे प्रकरणातील आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा
हे कॉल सेंटर तीन वेगवेगळ्या ठिकाणी कार्यरत होते. यामध्ये हरी ओम आयटी पार्क ,युनिव्हर्सल आउटसोर्सिंग सर्व्हिसेस ,
ओसवाल हाऊस या ठिकाणी चालू होते. छाप्यात पोलिसांनी साधारणपणे एक कोटी किमतीचे साहित्य जप्त केले आहे यामध्ये ८५२ हार्ड डिस्क ,हाय-एंड सर्व्हर आणि डीव्हीआर सिस्टम ,लॅपटॉप आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे .दररोज शेकडो कॉल करून फसवणूक करणाऱ्या या कॉल सेंटर्समधून मिळणाऱ्या एकूण कमाईचा मोठा वाटा संचालक आणि इतर मालक मिळवायचे.
या छाप्यात पोलिसांनी सात जणांना अटक केली असून, यामध्ये २४ वर्षीय हैदर अली अय्युब मन्सुरी हा मुख्य आरोपी असल्याचे उघड झाले आहे. तो एका कॉल सेंटरचा मुख्य संचालक असून, इतर आरोपी हे त्याचे सहकारी आणि व्यवस्थापक आहेत.मुख्य आरोपी अद्याप फरार असून, पोलिसांना संशय आहे की या कॉल सेंटरच्या माध्यमातून आणखी काही व्यावसायिक भागीदार आणि मोठे गुन्हेगार या फसवणुकीत सहभागी असू शकतात. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून, जप्त केलेल्या दस्तऐवजांची आणि डिजिटल पुराव्यांची पडताळणी केली जात आहे.
या प्रकरणात काशिमीरा आणि नयानगर पोलीस ठाण्यात कलम ३८४ – खंडणी,कलम ४१९ – तोतयागिरी करून फसवणूक,कलम ४२० – फसवणूक,कलम ७२ (१) आणि ७५ – भारताबाहेरील गुन्ह्यांसाठी लागू या कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.याशिवाय, भारतीय टेलीग्राफ कायद्यांतर्गतही (कलम २५) या आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.या कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात पैसे मिळत होते. पोलिसांच्या माहितीनुसार, काही आरोपींनी स्वतःच्या सुरक्षेसाठी तब्बल ६०,००० डॉलर्स (सुमारे ५० लाख रुपये) खर्च केले होते.ठाणे पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. यात सहभागी असलेल्या इतर आरोपींना पकडण्यासाठी पोलिस अमेरिकन एजन्सींशी संपर्क साधत आहेत.पुढील काही दिवसांत आणखी अटक होण्याची शक्यता असून, हे संपूर्ण रॅकेट किती मोठ्या प्रमाणावर कार्यरत होते, याचा तपास सुरू आहे.
या घटनेनंतर पोलिसांनी नागरिकांना सावध राहण्याचा इशारा दिला आहे. अनोळखी किंवा संशयास्पद आंतरराष्ट्रीय नंबरवरून येणाऱ्या कॉल्सला प्रतिसाद देऊ नये आणि कोणत्याही परिस्थितीत वैयक्तिक माहिती किंवा बँक तपशील शेअर करू नये.