परमबीरसिंगांनी मोहन भागवतांना उचलून आणण्याचे दिले होते आदेश (Photo Credit- Social Media)
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात अनेक महत्त्वपूर्ण घडामोडी घडत आहेत. त्यात आता 2008 च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात मुंबईचे तत्कालीन एटीएस प्रमुख आणि माजी पोलिस आयुक्त परमबीरसिंग यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना नागपूरहून उचलून मुंबईत आणण्याचे आदेश दिले होते. असा खळबळजनक दावा माजी एटीएस अधिकारी मेहबूब मुजावर यांनी एनआयए न्यायालयात केला आहे.
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाची सुनावणी मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष एनआयए न्यायालयात सुरू आहे. न्यायाधीश ए. के. लाहोटी यांच्यासमोर झालेल्या सुनावणीदरम्यान, आरोपी क्रमांक 10 सुधाकर द्विवेदी यांच्या वतीने वकील रणजित सांगळे यांनी या प्रकरणात मोठा खुलासा केला. त्यांनी सांगितले की, एके दिवशी परमबीरसिंग यांनी तत्कालीन एटीएस अधिकारी मेहबूब मुजावर यांना फोन करून मोहन भागवत यांना मुंबईत आणण्याचे आदेश दिले. परमबीर यांनी दिलेला हा आदेश तोंडी आणि कायदेशीरदृष्ट्या योग्य नव्हता, म्हणून त्यांनी त्याचे पालन केले नाही, अशीही माहिती आहे.
परमबीर सिंह यांच्या आदेशाचे पालन न केल्यामुळे मुजावर यांना सोलापूरमध्ये खोट्या प्रकरणात अडकवण्यात आले. सोलापूर न्यायालयात दिलेल्या जबाबात मुजावर यांनी ही माहिती दिली आहे.
हिंदू दहशतवादाची खोटी कहाणी
वकील सांगळे यांनी याचिकेत असा दावाही केला की, मालेगाव बॉम्बस्फोटाचा तपास खोटा होता आणि हिंदू दहशतवादाची खोटी कहाणी पसरवण्याचा त्यांचा उद्देश होता.2008 च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात सात आरोपी आहेत. ज्यात माजी खासदार साध्वी प्रज्ञा ठाकूर, लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, अजय राहिरकर, समीर कुलकर्णी, सुधाकर द्विवेदी, सुधाकर चतुर्वेदी आणि निवृत्त मेजर रमेश उपाध्याय यांचा समावेश आहे.
100 कोटी वसूलीचे टार्गेट
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीरसिंग यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप केला होता की, त्यांनी त्यावेळी आणखी एक पोलिस अधिकारी सचिन वाझे यांना 100 कोटी रुपयांच्या वसुलीचे टार्गेट दिले होते. या खुलाशामुळे परमबीरसिंग देखील प्रसिद्धीच्या झोतात आले. यानंतर सिंग यांना मुंबई पोलिस आयुक्तपदावरून निलंबित करण्यात आले. त्यांच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला. पण नंतर, महायुतीचे शिंदे सरकार सत्तेत आल्यानंतर सिंग यांच्यावरील सर्व आरोप मागे घेण्यात आले.