खैरांच्या लाकडाचा ट्रक पकडला (फोटो- टीम नवराष्ट्र)
पाटण: पाटण वनविभागाने कोयनानगर येथे मोठी कारवाई केली आहे. गुजरातहून (वापी) चिपळूणच्या दिशेने विनापरवाना ओलीव खैराच्या लाकडाची वाहतूक करणारा टाटा कंपनीचा ट्रक (जीजे १५ झेड १०८३) पाटण वनविभागाने कराड-चिपळूण राज्यमार्गावरील हेळवाक चेकनाक्यानजीक जप्त केला आहे. या ट्रकमध्ये सुमारे १५ लाखापेक्षा जास्त किमतीची खैराची लाकडे असून ट्रकसहीत सुमारे २० लाखांचा मुद्देमाल वनविभागाने कारवाईत जप्त केला आहे. या प्रकरणी ट्रक चालक जैनुद्दिन अहमद सिद्दिकी व क्लिनर दिनेश कुमार यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना पाटण वनविभागाने ताब्यात घेतले आहे.
गुजरातमधील वापीमधून विनापरवाना ओलीव खैराच्या लाकडाने भरलेला ट्रक (क्र. जी. जे. १५ झेड. १०८३) हा चिपळूणच्या दिशेने निघाला होता. याबाबत दि. २५ रोजी गोपनीय माहिती वनविभागाला समजल्यानंतर वनविभागाने तातडीने पावले उचलली. खैराच्या लाकडाचा ट्रक हा कराड-चिपळूण राज्यमार्गावरील कोयनानगर विभागातील हेळवाक येथील चेकनाक्यानजीक आला असता संशय निर्माण झाल्याने कर्मचाऱ्यांकडून ट्रकची तपासणी करण्यात आली. यावेळी ट्रकमध्ये ओलीव खैराची लाकडे असल्याचे आढळून आले. ट्रकसह मुद्देमाल जप्त करुन तो पाटण येथील वनविभागाच्या परिसरात लावण्यात आला आहे.
या ट्रकमध्ये असणाऱ्या खैराच्या लाकडाची किंमत अंदाजे पंधरा लाखांवर असण्याची शक्यता असून ट्रकसहीत सुमारे वीस लाखांचा मुद्देमाल पाटण वनविभागाने जप्त केला आहे. या प्रकरणी ट्रकचालक जैनुद्दिन अहमद सिरिकी व क्लिनर दिनेश कुमार अशा दोघांवर पाटण वनविभागात गुन्हा दाखल करून ताब्यात घेण्यात आले आहे. उपवनसंरक्षक आदिती भारद्वाज यांच्या मार्गदर्शनाखाली पाटणचे वनक्षेत्रपाल राजेश नलवडे, पाटणचे वनपाल यशवंत सावर्डेकर, पाचगणीचे वनरक्षक विशाल हरपळ, गोवारेचे वनरक्षक राम मोटे, वनरक्षक रोहित लोहार, कायम वनमजूर यशवंत बनसोडे यांनी ही कारवाई केली. वनक्षेत्रपाल राजेश नलवडे अधिक तपास करत आहेत.
गुजरातपासून ट्रक आलाच कसा?
एवढ्या मोठ्या प्रमाणात विनापरवाना खैराच्या लाकडाची वाहतूक करणाऱ्या ट्रकवर पाटण वनविभागाची ही सर्वांत मोठी कारवाई आहे. लाखो रुपये किंमतीच्या खैराच्या लाकडाने भरलेला ट्रक हा गुजरातमधील वापीमधून चिपळूणच्या दिशेने निघाला होता. हा ट्रक चिपळूणच्या वेशीवरच हेळवाक येथे पाटण वनविभागाने कारवाई करून ताब्यात घेतला. मात्र गुजरातपासून इथपर्यंत हा ट्रक आलाच कसा? या ट्रकबाबत कोणालाही संशय कसा आला नाही की आर्थिक तडजोड करून हा ट्रक पुढे पाठविण्यात आला? असे एक ना अनेक प्रश्न यानिनित्ताने उपस्थित झाले आहेत.
तब्बल ४१ लाखांच्या फसवणूक प्रकरणी दोघांवर गुन्हा
तब्बल ४१ लाखांच्या फसवणूक प्रकरणी दोन जणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, २०१९ ते २०२४ दरम्यान महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनीमध्ये ज्युनिअर सिक्युरिटी ऑफिसर म्हणून नोकरी लावतो, असे आमिष दाखवून तुषार विजय साळुंखे रा. कारंडवाडी महाडिक कॉलनी (ता. सातारा), त्यांचा भाऊ जयवंत विजय साळुंखे, वडील विजय साळुंखे, मोठा भाऊ सचिन साळुंखे यांच्याकडून ऑनलाइन, आरटीजीएस, कॅश स्वरूपात ४१ लाख रुपये घेऊन बनावट नियुक्तीपत्र देऊन नोकरी न लावता फसवणूक केल्याप्रकरणी पार्थ केशवराव राऊत (रा. मधुबन कॉलनी, जुनी सांगवी, पुणे) आणि राजेंद्र दत्तात्रय होळकर (रा. खडकी, पुणे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक काळे करीत आहेत.