अभ्यासाच्या ताणाला कंटाळून विद्यार्थ्याची आत्महत्या (फोटो- istockphoto)
पिंपरी: पिंपरी-चिंचवडमधील रावेत परिसरात राहणाऱ्या पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रथम वर्षातील विद्यार्थ्याने रविवारी रात्री आत्महत्या केली. अभियांत्रिकीच्या कठीण अभ्यासक्रमाचा आणि वाढत्या अभ्यासाचा ताण सहन न झाल्याने त्याने हे अत्यंत टोकाचे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे.अवधूत अरविंद मोहिते (वय १८, रा. रावेत, मूळ गाव – वाखारी) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. तो पीसीसीओई महाविद्यालयात संगणक शास्त्र शाखेत प्रथम वर्षात शिक्षण घेत होता. अवधूतचे पालक दोघेही शिक्षक असून, तो काही महिन्यांपूर्वीच कॉलेजसाठी साताऱ्याहून पिंपरी चिंचवडमध्ये आला होता.
घटनेचा तपशील
अवधूत रावेत येथील साई मंगल हाऊसिंग सोसायटीमध्ये आपल्या दोन मित्रांसोबत भाड्याने राहत होता. रविवारी रात्री उशिरापर्यंत तो आपल्या खोलीत एकटाच होता. त्याचे रुममेट्स परत आल्यानंतर त्यांनी दरवाजा ठोठावला, मात्र प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी दरवाजा तोडला असता अवधूतने नायलॉन दोरीच्या सहाय्याने छताच्या पंख्याला गळफास घेतल्याचे आढळले. तात्काळ त्याला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.|
अभ्यासाचा ताण ठरला कारण?
पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, अवधूतला कॉलेज सुरू झाल्यापासून अभ्यासात अडचणी येत होत्या. विशेषतः संगणकशास्त्रातील एका विषयामुळे तो तणावात होता. मित्र आणि कुटुंबीयांनी सांगितले की तो अंतर्मुख स्वभावाचा होता आणि आपली समस्या कोणालाही सांगत नव्हता. गेल्या काही दिवसांपासून तो मानसिक ताणाखाली असल्याचे मित्रांनी पोलिसांना सांगितले आहे.
पोलिस तपास सुरू
या प्रकरणी रावेत पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन फटांगरे यांनी सांगितले की,”ही घटना रविवारी रात्री घडली. आम्ही अपघाती मृत्यू म्हणून नोंद केली आहे. प्राथमिक चौकशीत आत्महत्येचे कारण अभ्यासाचा ताण असल्याचे दिसते. पुढील तपास सुरू आहे.” अवधूतच्या मृत्यूने पीसीसीओई महाविद्यालय परिसरात शोककळा पसरली आहे. मित्रपरिवार आणि सहाध्यायी विद्यार्थ्यांमध्येही हळहळ व्यक्त केली जात आहे.






