पोलिसांनी केली घरफोड्यांची उकल (फोटो- istockphoto)
दिघी पोलिसांची दमदार कारवाई
तीन घरफोड्यांची केली उकल
साडे चार लाखांचा ऐवज जप्त
पिंपरी: दिघी पोलिस ठाण्याच्या पथकाने केवळ काही तासांत सलग तीन घरफोड्यांच्या गुन्ह्याची उकल केली आहे. पोलिसांनी एका संशयिताला जेरबंद करत त्याच्याकडून १४५ ग्रॅम सोन्याचे दागिने, सहा मोबाईल फोन आणि ३२ हजार रुपये रोख असा एकूण साडेचार लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.
रोहित रायमशी मत्तू (३२, रा. भारतमाता नगर, दिघी. मूळ रा. जम्मू काश्मीर), असे अटक केलेल्याचे नाव आहे. पोलिस उपायुक्त बापू बांगर यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिघी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गजानन महाराज नगर येथील परमेश्वर बापूराव गिराम (वय ५९) यांच्या घरात १५ ऑक्टोबर रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास घरफोडी झाली होती. त्यात १४ तोळ्यांहून अधिक सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरीला गेली. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी घटनास्थळाची आणि परिसराची पाहणी केली. त्यावेळी दिघी परिसरातील संतोष तानाजी खोत आणि प्रतिभा पाटील यांच्या घरातही चोरी झाल्याबाबत वरिष्ठ निरीक्षक वाघ यांना माहिती मिळाली. त्यांनी तपास पथकाला सूचना करून तिन्ही घटनांचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. तीन्ही घरफोडीच्या घटनांमध्ये एक संशयित व्यक्ती सीसीटीव्ही फुटेजमध्ये आढळून आला. त्यावरून तीन्ही घरफोड्यांमध्ये एकाच संशयिताचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाले.
घरफोडी प्रकरणी दिघी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, सीसीटीव्ही फुटेजमधील संशयिताच्या चालण्याच्या लकबीवरून त्याचा माग काढण्यात आला. त्यासाठी दिघी पोलिसांच्या तपास पथकाने सापळा रचून अवघ्या काही तासांत संशयिताला ताब्यात घेतले. झडतीदरम्यान संशयिताकडून चोरीच्या सोन्याचा व चांदीचा मुद्देमाल, सहा मोबाईल फोन, रोख ३२ हजार ३० रुपये, घड्याळे, हेडफोन आणि गुन्ह्यात वापरलेले कपडे हस्तगत केले. पोलिस उपायुक्त बापू बांगर, सहायक आयुक्त सुधाकर यादव, दिघीचे वरिष्ठ निरीक्षक प्रमोद वाघ, निरीक्षक विनायक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक श्रीनिवास कामूनी, हवालदार योगेश नागरगोजे आणि तपास पथक यांनी केली.
टेम्पो चालकाची महिला पोलिसाला मारहाण
टेम्पो चालकाने त्याचा टेम्पो पिंपरी मार्केटमध्ये रस्त्यात लावला. त्याला टेम्पो बाजूला घेण्यास सांगितल्याने टेम्पो चालकाने महिला वाहतूक पोलिसाला मारहाण केली. ही घटना सोमवारी (20 ऑक्टोबर) दुपारी एक वाजताच्या सुमारास शगुन चौकाजवळ पिंपरी येथे घडली. शरद अशोक कांबळे (25, मांजरी खुर्द, पुणे) याला पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी महिला पोलीस शिपाई जयश्री जाधव यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.