संग्रहित फोटो
पुणे : राज्यासह देशभरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, दररोज चोरटे नागरिकांच्या लाखो रुपयांवर डल्ला मारत आहेत. वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. अशातच आता पुण्यातून आणखी चोरीची घटना उघडकीस आली आहे. दिवाळीत एसटी बसमधील वाढलेल्या गर्दीचा गैरफायदा घेऊन प्रवाशांचे पर्स व पाकिटे चोरणाऱ्या तीन महिलांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाने ही कारवाई वाकडेवाडी परिसरात केली असून, त्यांच्याकडून चार लाख १२ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
आशा देविदास लोंढे (वय ६०), रेखा मनोहर हतागंळे (वय ३५) आणि हेमा दिगंबर हतागंळे (वय ४१, सर्व रा. लोणी काळभोर, पुणे) अशी अटक केलेल्या महिलांची नावे आहेत. गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक आयुक्त विजय कुभांर, युनिट चारचे पोलिस निरीक्षक जितेंद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक वैभव मगदुम व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.
तिघीही लोणी काळभोर परिसरातील आहेत. तिघींनी नाशिक-इस्लामपूर एसटी बसमधील गर्दीत एका महिलेचा मुद्देमाल चोरल्याची कबुली दिली. गुन्हे शाखा युनिट चारचे पथक हद्दीत गस्तीवर होते. त्यादरम्यान वाकडेवाडी बस स्थानक येथे संशयित महिला थांबल्याची माहिती पोलिस अंमलदार प्रवीण राजपूत, संजय आढारी यांना मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून वाकडेवाडी बसस्टॉपवर छापा टाकला. पथकाने येथून तिघींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून एक हजार रुपये रोख आणि सोन्याचे दागिने असा ४ लाख १२ हजार २३४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.






