एमडी ड्रग्स विक्रीप्रकरणी पोलीस हवालदारालाच अटक! प्रकाश पवारसह दोघांना बेड्या; ९.२ ग्रॅम एमडी ड्रग्स जप्त
मिरा-भाईंदर शहरात अंमली पदार्थांच्या विक्रीचा प्रश्न गंभीर बनलेला असताना, त्याविरोधात कारवाई करण्याची जबाबदारी असलेल्या पोलीस दलातील कर्मचाऱ्यावरच एमडी ड्रग्स विक्रीचा आरोप झाल्याने खळबळ उडाली आहे. मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयातील पोलीस हवालदार प्रकाश पवार यांना अंमली पदार्थ विरोधी कक्षाने अटक केली असून, त्यांचा कथित साथीदार अखिलेश कुमार यालाही अटक करण्यात आली आहे. गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे, सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन पाटील आणि अंमली पदार्थ विरोधी कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशीलकुमार शिंदे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात येते. भाईंदर पूर्व येथील गोल्डन नेस्ट परिसरात, गॅस गोडाऊनच्या गल्लीत हनुमान मंदिराजवळ सापळा रचून पवार यांना ताब्यात घेण्यात आले.
या कारवाईत ९.२ ग्रॅम एमडी ड्रग्स, एक बर्गमन दुचाकी, रोख १० हजार रुपये आणि दोन मोबाईल फोन असा एकूण १ लाख ३२ हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती आहे. याप्रकरणी नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. पवार हे २०१० पासून पोलीस सेवेत असून, त्यांनी यापूर्वी मिरारोड पोलीस ठाण्यात काम केले होते. अलीकडेच त्यांची कनकिया पोलीस ठाण्यातून पोलीस मुख्यालयात बदली झाली होती. दरम्यान, मिरा-भाईंदर शहर अंमली पदार्थमुक्त करण्याचा संकल्प पोलीस आयुक्त अनिकेत कौशिक यांनी व्यक्त केला असताना, पोलिसांच्याच कर्मचाऱ्यावर अंमली पदार्थ विक्रीचा आरोप झाल्याने या मोहिमेच्या अंमलबजावणीबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
शहरात अंमली पदार्थांची विक्री सुरू असल्याच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर केवळ विक्रेत्यांवर कारवाई करून पुरेसे ठरणार नाही, तर या व्यवहारामागील पुरवठादार, ग्राहकांपर्यंत पोहोचणारी साखळी आणि संभाव्य सहकारी यांचाही तपास होणे आवश्यक आहे. यापूर्वी नयानगर पोलीस ठाण्याशी संबंधित एका कर्मचाऱ्याच्या शेतात अंमली पदार्थ निर्मितीचा कारखाना आढळल्याचे प्रकरणही चर्चेत आले होते. त्यामुळे पोलीस दलातील कर्मचाऱ्यांवर प्रभावी देखरेख, तक्रारींची निष्पक्ष चौकशी आणि अंमली पदार्थविरोधी मोहिमेची परिणामकारकता याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर धायगुडे करीत असून, अंमली पदार्थांच्या व्यवहारामागील संपूर्ण साखळी उघड होते का, याकडे लक्ष लागले आहे.
Yavatmal News: कापसाने गाठला ९,६०० रुपयांचा भाव! कापसाचे दर वधारले, मात्र शेतकऱ्यांचे उत्पादन घटले
Ans: एमडी ड्रग्स विक्रीप्रकरणी पोलीस हवालदार प्रकाश पवार यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यासोबत अखिलेश कुमार यालाही अंमली पदार्थ विरोधी कक्षाने ताब्यात घेतले आहे.
Ans: या कारवाईत ९.२ ग्रॅम एमडी ड्रग्ससह एकूण १ लाख ३२ हजार ५५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
Ans: न्यायालयाने दोन्ही आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. अंमली पदार्थांचा पुरवठा कोठून होत होता आणि या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा तपास होणे महत्त्वाचे आहे.






