सौजन्य - नवराष्ट्र टीम
पुणे : मेफेड्रोन, गांजा तसेच इतर अमली पदार्थांसोबतच पुणे पोलिसांनी एका परराज्यातील ड्रग्ज तस्काराला बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याकडून नशेसाठी वापरण्यात येणाऱ्या ‘याबा’ गोळ्या जप्त केल्या आहेत. फरासखाना पोलिसांनी त्याच्याकडून ७५. ३६ ग्रॅम वजनाच्या ७ लाख ७४ हजार रुपये किंमतीच्या एकूण ७१८ गोळ्या जप्त केल्या आहेत. निशान हबीब मंडल (वय ४७, रा. बंगळूरू, कर्नाटक) असे पकडण्यात आलेल्याचे नाव आहे.
याप्रकरणी फरासखाना पोलिस ठाण्यात मंडल याच्याविरुद्ध अमली पदार्थ विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस उपायुक्त कृषिकेश रावले, सहायक आयुक्त अनुजा देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक प्रशांत भस्मे, सहायक निरीक्षक शितल जाधव, उपनिरीक्षक अरविंद शिंदे व त्यांच्या पथकाने केली.
पुण्याच्या मध्यभागात फरासखाना पोलिसांचे पथक हद्दीत गस्त घालत होते. यादरम्यान, बंगळूरु येथील एक ड्रग्ज तस्कर अंमली पदार्थयुक्त याबा गोळ्या विकण्यासाठी बुधवार पेठेतील कॅसेट गल्ली येथे येणार असल्याची माहिती मिळाली. या माहितीची पथकाने खातरजमा केली. तसेच, परिसरात सापळा रचला. संशयित पहाटे पाचच्या सुमारास याठिकाणी आला असता पथकाने त्याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून याबा गोळ्या मिळून आल्या. पोलिसांनी मंडल याच्याकडून ७१८ गोळ्या, एक दुचाकी, चार मोबाईल आणि रोख रक्कम असा एकूण ६ लाख ५८ हजार ८६० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
मेफेड्रोन विक्री करणाऱ्याला ठोकल्या बेड्या
गेल्या काही दिवसाखाली मुंबईहून पुण्यात आलेल्या एकाकडून पोलिसांनी मेफेड्रोन (एमडी) हा अमली पदार्थ पकडला आहे. त्याच्याकडून २ ग्रॅम एमडी, मोबाइल, रोकड असा एक लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. संदीप सुकनराज जैन (वय ४२, रा. भुलेश्वर, मुंबई) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध अमली पदार्थ प्रतिबंध कायद्यान्वये फरासखाना पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवार पेठेत पोलिसांचे पथक शनिवारी दुपारी गस्त घालत होते. त्यावेळी परिसरातील एका पानपट्टीजवळ जैन थांबला होता. त्याच्याकडे मेफेड्रोन असल्याची मााहिती पोलीस कर्मचारी प्रशांत पालांडे यांना मिळाली. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या पथकाने सापळा लावून जैन याला पकडले. त्याच्याकडून दोन ग्रॅम २४ मिलिग्रॅम मेफेड्रोन, मोबाइल संच, तसेच पाच हजार ६२० रुपये असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जप्त केलेल्या मेफेड्राेनची किंमत ४५ हजार रुपये आहे. जैन याने मेफेड्रोन कोठून आणले, तसेच कोणाला विक्री करणार होता, यादृष्टीने तपास करण्यात येत आहे.






