हिंगोलीमध्ये गुन्हेगारी वाढत असून नवीन पोलीस अधीक्षकांकडून जोरदार कारवाई केली जात आहे (फोटो - Istock)
हिंगोली : मकरंद बांगर : हिंगोली जिल्ह्यात नूतन पोलीस अधीक्षकांच्या नेतृत्वाखाली अवैध धंद्यांविरुद्ध आक्रमकपणे कारवाई केली जात असली, तरी गुन्हेगारी (Crime News) मात्र झपाट्याने वाढत असल्याचे वास्तव समोर येत आहे. मराठवाड्यातील इवलासा जिल्हा म्हणून हिंगोलीची ओळख असल्याने आधीच अनेक वरिष्ठ अधिकारी या जिल्ह्याकडे येण्याचे टाळतात. जिल्ह्यात अवैध धंद्यांवर नियंत्रण आणण्यात यापूर्वीच्या पोलीस अधीक्षकांना फारसे यश न आल्याने भाजपाकडून अवैध धंद्यांवर कठोर नियंत्रण आणण्याची जाहीर मागणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी करण्यात आल्यानंतर कार्यक्षम अधिकारी म्हणून डॉ. नीलभ रोहन यांची पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली. पदभार स्वीकारताच डॉ. रोहन यांनी अवैध धंद्यांविरोधात पाश आवळण्यास सुरुवात केली. दररोज कारवाया, छापे आणि गुन्हे दाखल होत असल्याचे चित्र दिसत असले, तरी गुन्हेगारीवर ठोस नियंत्रण मिळवण्यात त्यांना अद्याप यश येताना दिसत नाही.
हे देखील वाचा : पवार कुटुंबियांमध्ये किती दिवसांचा दुखवटा? टीका करणाऱ्यांना प्रफुल्ल पटेलांचे उत्तर, म्हणाले…
अनेक गंभीर गुन्ह्यांची झाली नोंद
गुन्ह्याची वाढती मालिका जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेतला असता खून, चोरी, लूटमार, मारहाण, अत्याचार यांसारख्या गंभीर घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे स्पष्ट होते. २८ जानेवारी रोजी आखाडा बाळापूर येथील बसस्थानकात एका महिलेच्या गळ्यातील २४ हजार रुपये किमतीची सोन्याची चैन पळविण्यात आली. याच दिवशी वसमत येथे एका मुलीनेच दोन साथीदारांच्या मदतीने आपल्या वडिलांचे ६ लाख ८० हजार रुपये चोरल्याची घटना उघडकीस आली. ३० जानेवारी रोजी हिंगोली-वाशिम महामार्गावरील अंबाळा फाट्यावर एका धाबा मालकावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. कळमनुरी तालुक्यातील शेनोडी गावात दोन गटांत लाठ्याकाठ्या, तलवारी व कुराडीन हाणामारी झाली.
या प्रकरणी ३० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच दिवशी सेनगाव तालुक्यातील धानोरा येथे भरदिवसा एका सराफ व्यावसायिकाला ६ लाख ९७ हजा ५०० रुपयांच्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांस लुटण्यात आले, यात ११४.५ ग्रॅम सोने क ३६०० ग्रॅम चांदीचा समावेश आहे. हिंगोली रेल्वे स्थानकाच्या पार्किंग परिसरात एक तरुणावर पाठलाग करून खंजीराने हल्ला करण्यात आला. १ फेब्रुवारी रोजी वसमत तालुक्यातील डोनवाडा शिवारात एका तरुणाला झाडाला बांधून अमानुष मारहाण करण्यात आली यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
हे देखील वाचा : “पाटील, पटेल या ठाकरेंच्या विधानाचा पटेलांकडून समाचार; म्हणाले, “ठाकरे, वाकरे…”
मतिमंद मुलीवर अत्याचार
३१ जानेवारी रोजी वसमत येथे फटाक्याच्या वादातून एका तरुणाची निघृण हत्या करण्यात आली. याच दिवशी कळमनुरी तालुक्यातील एका ६९ वर्षीय वृद्धाने चॉकलेटचे आमिष दाखवून मतिमंद मुलीवर अमानुष अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली. याच दिवशी हिंगोली शहरातील गांधी चौकात दुचाकी वर कारवाई केल्याच्या रागात पोलीस कर्मचाऱ्यांची कॉलर धरून मारहाण केली. यामुळे पोलीस दलाची प्रतिमा मलीन होत आहे, १ फेब्रुवारी रोजी माळेगाव येथे एकाच रात्री दोन ठिकाणी चोरी झाली. बळीराम आसोले यांच्या घरी ५० हजार रुपये रोख व १० तोळ्यांचे सोने-चांदीचे दागिने लंपास करण्यात आले, तर याच गावातील कापड दुकानदार तानाजी वैद्य यांच्या दुकानातून ४० हजार रुपये चोरट्यांनी पळविले.






