सौजन्य - नवराष्ट्र टीम
पुणे : खेड भागात वादविवादातून मित्राचा चाकू भोसकून खून केल्यानंतर फरार असणाऱ्या एका आरोपीला बंडगार्डन पोलिसांच्या तपास पथकाने जेरबंद केले आहे. ससून रुग्णालयाजवळ ही कारवाई करण्यात आली आहे. सलमान अबुलगणी शेख (वय २३, वडगाव रोड, आळंदी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याघटनेत शरद गायकवाड याचा खून झाला आहे. याप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल आहे. ३ नोव्हेंबर रोजी रात्री हा प्रकार घडला होता. त्यानंतर सलमान हा पसार झालेला होता. ही कारवाई सहाय्यक आयुक्त दीपक निकम, वरिष्ठ निरीक्षक रवींद्र गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक धीरज गुप्ता, स्वप्निल लोहार, ज्ञाना बडे, मनोज भोकरे व त्यांच्या पथकाने केली आहे.
विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस सतर्क आहेत. फरार व पाहिजे आरोपी तसेच सराईतांवर लक्ष ठेवले जात आहे. यादरम्यान, बंडगार्डन पोलीस हद्दीत गस्त घालत होते. तेव्हा ससून रुग्णालयाजवळ सकाळी साडे नऊच्या सुमारास एकजन संशयित दिसून आला. त्यामुळे त्याला पथकाने थांबवून विचारपूस केली. पण, तो घाबरला. तसेच, उत्तरे देखील उडवा-उडवीची दिली. त्यामुळे त्याच्यावर संशय बळावला. त्याला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणण्यात आले.
त्याच्याकडे सखोल तपास केल्यानंतर त्याने चाकण ते खेड दरम्यान खरपुडी फाटा येथे मित्र शरद याचा चाकू भोसकून खून केल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी याबाबत खेड पोलिसांशी संपर्क साधत, यासंदंर्भात माहिती घेतली. तेव्हा खेड पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल असल्याचे समोर आले. त्याला पुढील कारवाईसाठी खेड पोलिसांच्या ताब्यात दिले आहे
हे सुद्धा वाचा : बंदी असूनही छुप्या पद्धतीने गुटख्याची अवैध वाहतूक सुरूच; पोलिसांनी पकडला ‘इतक्या’ लाखांचा मुद्देमाल
४० तडीपार गुंडांना पकडले
निवडणुकीच्या काळात राजकीय पक्ष तसेच उमेदवारांकडून गुंडाचा वापर केला जात असल्याचा आरोप होत असतानाच पुण्यात आचारसंहिता लागू झाल्यापासून जवळपास ४० तडीपार गुंडांना पुणे पोलिसांनी पकडले आहे. त्यात पुण्यात ऐन निवडणुकीच्या काळात अन् प्रचाराच्या धामधुमीत हे तडीपार गुंड शहरात हजेरी लावत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे या आरोपींमध्ये तथ्य असल्याचे दिसते. राज्यभरात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. प्रचार शिगेला पोहचला आहे. आरोपी-प्रत्यारोप होत आहेत. हे सुरू असतानाच राजकीय पक्ष तसेच उमेदवार गुंडांचा वापर करत असल्याचाही आरोप होत आहे. दरम्यान निवडणूकीत शहरात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पुणे पोलिसांकडून सतर्कता बाळगत काम केले जात आहे. त्यामध्ये बेकायदा हत्यारे बाळगणाऱ्या गुंडांसह तडीपार गुंडावर नजर ठेवली जात असून, त्यांना चाप लावण्यात येत आहे.