संग्रहित फोटो
पुणे : खराडी परिसरात मसाज पार्लरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर पोलिसांनी छापा कारवाई केली. या कारवाईत नागालँड, पश्चिम बंगाल, राजस्थानसह तरुणींसह पाच जणींना ताब्यात घेण्यात आले. याप्रकरणी मसाज पार्लरच्या मालकासह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी मसाज पार्लरचा मालक कफील उद्दीन (वय ३०, रा. जमनामुख, आसाम) याच्यासह व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी खराडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. खराडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संजय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मोनाली भदे, नवनाथ वाळके यांनी ही कारवाई केली.
पुणे शहरात मसाज पार्लरच्या माध्यमातून वेश्या व्यवसाय चालविला जात असल्याचे सातत्याने समोर आले आहे. यापार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तांनी अशा पार्लरवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, खराडीतील एका इमारतीत ‘सेलेस्टीया द वेलनेस स्पा’ येथे वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती समजली. त्यानूसार, पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवत याची खातरजमा केली. त्यानंतर पथकाने तेथे छापा टाकला. पार्लरमधील तरुणींना पैशांचे आमिष दाखवून वेश्याव्यवसायास प्रवृत्त केले जात असल्याचे उघडकीस आले. मसाज पार्लरमधील व्यवस्थापकाला ताब्यात घेण्यात आले असून, तो अल्पवयीन असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी पाच तरुणींची सुटका केली. दरम्यान, काही दिवसांपूर्वी पोलिसांनी येथील एका पार्लरचा प्रकार समोर आणला होता. त्यानंतर सलग दुसरा प्रकार समोर आल्याने शहरात मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय जोरात सुरू असल्याचे दिसत आहे.